प्रथम स्मृतिदिनानिमित्त‘स्वरस्वती’मधून गानसरस्वती लतादीदींना अभिवादन
पुणे : अमर स्वर लाभलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी सलग तास गायन करत अनोखे अभिवादन करण्यात आले. गायिका मनीषा निश्चल्स महक प्रस्तुत ‘स्वरस्वती’ या हिंदी-मराठी गायन मैफलीतून अजरामर गीतांचा नजराणा पुणेकरांनी अनुभवला. गीतांच्या सादरीकरणासोबतच शिल्पकार सुरेश राऊत यांनी लतादीदींचे लाईव्ह शिल्प साकारत लक्ष वेधून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, खैय्याम, पं. हृदयनाथ मंगेशकर, गीतकार गुलजार यांच्यासह इतर मान्यवरांनी लतादीदींबद्दल व्यक्त केलेल्या भावनांच्या गफार मोमीन यांनी संकलित केलेल्या ध्वनिचित्रफिती पाहून श्रोते भारावून गेले.
कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात लतादीदींनी गायलेली व संगीतबद्ध केलेली मराठी गाणी ५ ते ८ या वेळेत, तर हिंदी गाणी ९ ते १२ या वेळेत सादर झाली. गायिका मनिषा निश्चल यांच्यासह स्वप्नजा लेले, अंजली मराठे, गायक जितेंद्र अभ्यंकर, गफ़ार मोमिन यांचे बहारदार गायन झाले. प्रसन्न बाम (हार्मोनियम) यांच्या संगीत संयोजनात यश भंडारे (सिंथेसायझर), केदार मोरे (ढोलक), अमित कुंटे (तबला), अभय इंगळे (ड्रमसेट), अजय अत्रे (ऑक्टोपॅड), अनिल करमरकर (सॅक्सोफोन), शैलेश देशपांडे (व्हायोलिन व बासरी), राधिका अंतुरकर (गिटार), समीर सप्रे (अकॉर्डीयन) यांनी वाद्यांची साथसंगत केली. आयन मोमीन यांनी ध्वनिसंयोजन, तर विजय चेन्नूर यांनी प्रकाश व्यवस्था पाहिली.
‘गगन सदन’ने मैफलीची सुरुवात झाल्यानंतर ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘शूर आम्ही सरदार’, ‘मी डोलकर’, ‘बाई बाई मनमोराचा’, ‘भय इथले संपत नाही’, ‘वारा गाई गाणे’, ‘मज सांग लक्ष्मणा’, ‘वादळ वारा सुटलो गो’ आदी अवीट गाण्यांना श्रोत्यांनी मनापासून दाद दिली. मध्यंतरानंतर ‘डौल मोराच्या’, ‘आज गोकुळात रंग खेळतो’, ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’, ‘माझे राणी माझे मोगा’, ‘राजसा जवळी बसा’, माळ्याच्या मळ्यामंदी’, ‘लटपट लटपट तुझं चालणं’ अशा लोकप्रिय गाण्यांनी श्रोत्यांना ठेका धरायला लावला.
हिंदी गाण्याच्या मैफिलीने तर रसिकांवर स्वरवर्षावच झाला. आपल्या मंजुळ आवाजाने मनीषा निश्चल यांनी अजरामर ‘सत्यम शिवम् सुंदरम’ सादर करत उत्स्फूर्त दाद मिळवली. त्यानंतर ‘अजीब दास्तान’, ‘तेरा मेरा प्यार अमर’, ‘बेख़ुदी सनम’, ‘एहसान तेरा होगा’, ‘वो चांद खिला’, ‘बंगले के पीछे’, दिल तेरा दिवाना’, ‘यारा सिली सिली’, ‘होठों में ऐसी बात’ या गीतांनी श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. ‘ये दिल और उनकी, निगाहों के साये’, ‘गाता रहे मेरा दिल’, ‘आजा सनम मधुर’, ‘मेरे नैना सावन भादो’, ‘आज फिर जीने की तमन्ना है’, ‘ना जिया लागेना’, ‘याद किया दिलने’ या आणि अशा बहारदार गीतांनी मैफलीत रंग भरला. ‘चलते चलते यूँ ही क़ोई’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

