पुणे – वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जेएमएफसी परीक्षा उत्तीर्ण होत न्यायाधीश होण्याचे असामान्य काम पुण्यातल्या सायली शेंडगे हिने केले आहे. पुण्यातल्या दत्तवाडी परिसरात सर्वसाधारण कुटुंबातल्या सायलीने मिळवलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
टेलरींग व्यवसायाच्या जोरावर आपले कुटूंब पोसणाऱ्या सायलीच्या वडिलांनी आपल्या तिन्ही मुलींना चांगले शिक्षण देत स्वतःच्या पायावर उभ केले. सायलीने विधी महाविद्यालयात प्रवेश घेत एलएलएमपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर ज्यूडीशियल मॅजिस्ट्रेटची परीक्षा दिली होती. मात्र अवघ्या एका गुणाने तिची ती संधी हुकली होती. या अपयशाने खचून न जाता सायलीने जिद्दीने अभ्यास सुरूच ठेवला आणि गेल्या वर्षी झालेल्या जेएमएफसी परीक्षेत घवघवीत यश मिळवत न्यायाधीश बनण्याचे स्वप्न साकारले. दत्तवाडी हा तसा पुण्यातला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला परिसर, अशा भागात राहत तसेच प्रसंगी वडिलांच्या टेलरींग व्यवसायात मदत करत सायलीने जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. फक्त इथेच न थांबता काहीतरी बनण्याच्या ध्येयाने सायलीने नेटाने प्रयत्न केले आणि अखेर तिला यश आले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

