पाणी विषयावर सकारात्मक भूमिकेची आणि दिशा दर्शक मार्गदर्शनाची गरज : पोपटराव पवार
सात दिवसीय ‘जलोत्सव’ महोत्सवाचा समारोप
पुणे :
‘पाणी विषयावर सकारात्मक भूमिकेची आणि दिशा दर्शक मार्गदर्शनाची गरज आहे. पाणी बचत आणि जलसंधारण यावर टीका टिपणे करीत वेळ घालविणे चांगले नाही प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे. भविष्य काळात पाण्याच्या प्रश्नाला कसे सामोरे जात येईल यावर विचार मंथन आवश्यक आहे. पाणी अडवणे, पाणी बचत आणि जलसंवर्धन केले तर हवामान बदल आणि पाणी प्रश्नावर उपाय निघू शकेल.’ असे मत हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी मुलाखतीमध्ये मांडले.
ते ‘रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट ३१३१’ च्या गुरुवारी झालेल्या ‘जलोत्सव २०१७’ महोत्सवाच्या अंतिम सातव्या पुष्पात बोलत होते.
पोपटराव म्हणाले, ‘अभ्यासक्रमात पाणी साक्षरता विषय घेणे महत्वाचे आहे. गावांमध्ये जल जागरूकता करणे अवघड काम आहे पण अशक्य नाही. खंबीर नेतृत्वाने हे शक्य आहे. रोटरी ने आयोजित केलेला हा सात दिवसीय उपक्रम यासाठी उपयुक्त ठरू शकतो. लोक प्रतिनिधी आणि प्रशासन एकत्र आल्यास विकास घडू शकतो. शहरातील लोकांनी पाणी वाचवायला आणि गावातील लोकांनी पाणी जिरवायला शिकले पाहिजे.’
यावेळी ‘यशदा’चे आनंद कुसावळे, सुनील जोशी, मकरंद टिल्लू, क्रांती शहा, जयश्री पंजीकर, पौर्णिमा पेंडसे, सतीश खाडे उपस्थित होते.
जलोत्सवाचे संयोजक सतीश खाडे यांनी प्रास्ताविक केले .
रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या ‘रोटरी जलोत्सव २०१७ ‘मध्ये ‘जागतिक तापमान वाढ, हवामान बदल आणि जलसंपदा’ या विषयावर पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कमिन्स सभागृहात ते बोलत होते.
सलग सात दिवस आयोजित या ‘जलोत्सव २०१७’ महोत्सवाचा गुरुवारी समारोप झाला. या जलोत्सवाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळला. समारोप प्रसंगी पोपटराव पवार यांच्या हस्ते पाणी प्रश्नावर मंथन घडवून आणण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा रोटरी जल विशेषांक ‘जल संवाद’ चे प्रकाशन झाले.
‘जलोत्सव २०१७’ च्या सातव्या दिवशी भूगोलतज्ज्ञ प्रा. डॉ. संजीव नलावडे, ‘ऍक्वा सॅवियो’ चे शिरीष पटवर्धन, ‘वनराई’ चे रवींद्र धारिया, ‘मिशन जलधारा’चे महेश शहा, डॉ. दत्ता देशकर ( ‘जलसंवाद’ मासिकाचे संस्थापक संपादक), मोहन पालेशा यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी ‘रोटरी क्लब ऑफ कात्रज, ‘रोटरी क्लब ऑफ पर्वती आणि ‘रोटरी क्लब ऑफ कॅम्प चा सत्कार करण्यात आला.
भूगोलतज्ज्ञ प्रा. डॉ. संजीव नलावडे यांनी ‘जागतिक तापमानातील वाढ आणि पाण्याचा साठा’ याविषयी माहिती दिली. ते म्हणाले ‘पाण्याचा साठा वाढविण्यासाठी प्रामुख्याने ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली’, ‘पुनर्प्रक्रिया’, ‘योग्य पीक’ आणि ‘जागरूकता व प्रशिक्षण’ या गोष्टी महत्वाच्या आहेत.’
‘वनराई’ चे रवींद्र धारिया म्हणाले, ‘वनीकरण करताना आमच्या संस्थेने पाणी आडवा, पाणी जिरवा’ यावर काम केले. विहिरीचे पुनर्भरण, वनराई बंधारे हे वेगळे तंत्रज्ञान वापरून गावातील लोकांना उत्पनाचे साधन मिळाले.’
महेश शहा यांनी ‘मिशन जलधारा’ प्रकल्प अंतर्गत ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही तेथे ती उपलब्धता निर्माण करण्याविषयी माहिती दिली.
डॉ दत्ता देशकर यांनी सिंचन सहयोग संस्था, सरोवर संवर्धिनी, पर्यावरण जतन, जल साक्षरता, जलसंवाद, जल साहित्य संमेलन याविषयी माहिती दिली.