पुणे – कंपनी जगतातील कामाच्या अनुभवांवर शबनम अस्थाना यांनी लिहीलेल्या ‘रोमान्सिंग युअर करिअर’ या पुस्तकाचे प्रकाशन द शेरेटन ग्रँड हॉटेलमध्ये शानदार समारंभात आज येथे झाले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ उद्योजक पद्मश्री लीला पूनावाला यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. लोकप्रिय म्युझिक जॉकी शुभ्रा मिश्रा या विशेष पाहुण्या होत्या, तसेच अनेक नामवंत व्यक्ती या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
“शबनम अस्थाना यांनी लिहीलेले हे पुस्तक खरोखर माहितीपूर्ण व प्रेरणादायी असून ते वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त करेल. मोठ्या वाचकवर्गापर्यंत हे पुस्तक पोचवण्याचा लेखिकेचा प्रयत्न प्रशंसनीय आहे,” या शब्दांत लीला पूनावाला यांनी कौतुक केले. यावेळी शुभ्रा मिश्रा यांनीही पुस्तकातील काही रंजक सारांशांचे वाचन करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
शबनम अस्थाना यांना कामाचा समृद्ध अनुभव आहे. त्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर समाज आणि कंपन्या यांच्यात संवाद आणि समन्वय घडवण्याचे काम करतात. या करिअरमध्ये त्यांना विविध व्यक्तींना भेटण्याची संधी मिळते. यातूनच आपल्या कामाचे अनुभव शब्दबद्ध करुन ‘रोमान्सिंग युअर करिअर’ हे पहिले पुस्तक लिहीण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. हे पुस्तक पेंग्विन रँडम हाऊसची सहयोगी असलेल्या ‘पार्ट्रिज इंडिया’तर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. शबनम अस्थाना यांचे अनुभव कुणाही नोकरदार व्यावसायिकांना आपलेच वाटणारे असल्याने वाचताना ते या लेखनाशी समरस होतील.
पुस्तकामध्ये वाचकांना कंपनी जगतातील काही महत्त्वाच्या पैलूंची ओळख करुन देण्यात आली आहे. वाचकांना हसवणाऱ्या, रडवणाऱ्या, करुणा, तिरस्कार उत्पन्न करणाऱ्या आणि अगदी प्रेरणा देणाऱ्या अशा सहज ओळखू येणाऱ्या विविध पात्रांच्या माध्यमातून लेखिकेने कार्यालयीन जीवनाचे चित्र रेखाटले आहे. या व्यक्तीरेखा त्यांच्या कामाच्या ठिकाणी नऊ ते पाच या वेळेत काम करत असतात आणि रोज एकमेकांशी संवाद साधत असतात.
यासंदर्भात शबनम अस्थाना म्हणतात, की तुमची शिकण्याची तयारी असेल तर तुमचा काम-धंदा हीच तुम्हाला प्रचंड ज्ञान पुरवणारे कोठार असते. तेथेच तुम्हाला यशोमार्गावर वेगाने झेपावण्याच्या भरपूर संधी मिळतात. कधीकधी कामाचे ठिकाण हे वादळी वातावरणही निर्माण करते, पण तुम्ही समजूतदारपणा आणि अनुभवाचा वापर केल्यास स्फोटक स्थिती टाळता येते. ‘रोमान्सिंग युअर करिअर’हे पुस्तक वाचकांना त्यांच्या स्वतःच्याच आठवणींचा पुनःप्रत्यय आणून देते. खेरीज पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणाच्या अखेरीस मौल्यवान मथितार्थही मिळतो. करिअर आणि नोकरीत आपल्यातील सर्वोत्तम ते देण्याची प्रेरणा त्यातून मिळते.
‘रोमान्सिंग युअर करिअर’
लेखिका – शबनम अस्थाना
सॉफ्टकव्हर, ६ x ९ इंच, १७६ पाने, आयएसबीएन ९७८१४८२८८८८५०, किंमत – ३९९ रुपये
ईबुक, १७६ पाने, आयएसबीएन ९७८१४८२८८८८४३, किंमत – १६९ रुपये
ॲमेझॉन, बार्न्स अँड नोबल, गुगल बुक्स व अन्य प्रमुख ऑनलाईन फेरविक्रेत्यांकडे उपलब्ध
मोबाईल : +९१९८२३२८९५९०