Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

साताऱ्यामध्ये पुन्हा ‘रोल, कॅमेरा,ॲक्शन’! ‘…… !!

Date:

पुणे -कोरोना विषाणूच्या संकटामध्ये लॉकडाऊन झालेली चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा ‘रोल, कॅमेरा, अॅक्शन’साठी सुरु झाली आहे. थांबलेल्या चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग आता पुन्हा सुरू होत आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याने पुढाकार घेत जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी काही नियम आणि अटींसह चित्रीकरणास परवानगी दिली आहे. विशेष बाब म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ आणि ‘टोटल हूबलाक’ या दोन मालिकांच्या चित्रीकरणास प्रत्यक्ष सुरुवात देखील झाली आहे.
डोळे दिपवणारं सह्याद्रीचं विस्तीर्ण आणि दाट खोरं, निसर्गाने केलेली मुक्तहस्ताने उधळण, बाराही महिने संथ वाहणाऱ्या कृष्णामाईचा काठ, शंभरहून अधिक हेमाडपंथी मंदिरे, नागमोडी रस्ते आणि दुतर्फा हिरवाईच सौंदर्य यामुळे सातारा हा चित्रपट सृष्टीसाठी पूर्वीपासूनच पोषक वातावरण असलेला जिल्हा. मुंबईमध्ये जे काही मिळत नाही आणि जे कृत्रिम पद्धतीने तयारही करता येत नाही ते सातारा जिल्ह्यामध्ये सह्याद्रीने भरभरुन दिल्यामुळे निसर्गतःच उपलब्ध आहे.
                   जिल्ह्यातील विशेषतः पाटण, वाई, जावळी आणि महाबळेश्वर या तालुक्यांमधील काही ‘लोकेशन्स’ निर्माते आणि दिग्दर्शकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. पाटणमधील कोयना धरण परिसर, नेहरू गार्डन, घाटमाथा, वनकुसवडे, खळे, बनपुरी आदी. महाबळेश्वरमधील अनेक पॉईंट्स, पाचगणी शहरामधील टेबललँड, शाळा, तापोळ्यामधील बोटिंग पॉईंट्स त्याचसोबत जावळीचे खोरं हे सुप्रसिद्ध आहे. तर ऐतिहासिक वाई शहर, धोम डॅम, मेनवली, वरखेडवाडी ही ठिकाण देखील पसंतीस उतरली आहेत.
                  जुन्या काळातील निर्माते आणि कलाकार तर आहेतच, परंतु अलीकडील काही वर्षांमधील प्रकाश झा, विशाल भारद्वाज, आशुतोष गोवारीकर, अरबाज खान, प्रभुदेवा, महेश कोठारे, या दिग्दर्शकांचा साताऱ्याकडे विशेष ओढा आहे. सरगम, मदर इंडिया, ओमकारा, गंगाजल, राजनीति, स्वदेस, मंगल पांडे, बाजीराव मस्तानी, दबंग टू आणि थ्री, चेन्नई एक्सप्रेस, तारे जमीन पर अशा चित्रीत झालेल्या चित्रपटांची नाव न संपणारी आहेत. तर झी मराठी या वाहिनीवरील लागीर झालं जी, मिसेस मुख्यमंत्री, टोटल हूबलाक या मालिकांचे चित्रीकरण जिल्ह्यामध्ये झाले.
              जिल्ह्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळवून देणारं हे क्षेत्र आहे. त्यात प्रामुख्याने शूटिंगसाठी लोकेशन्स शोधून देणे, स्थानिक स्तरावर हवी ती मदत मिळवून देण्यासाठी तरुणांनी स्वतःच्या पातळीवर तयार केलेली ‘एक खिडकी योजना’ ही निर्मात्यांना सोयीची वाटते. त्याचसोबत फोटोग्राफर, कॅमेरा सहाय्यक, सहाय्यक वेशभूषाकार, सहाय्यक केशभूषाकार, मेकअपमॅन/वुमॅन, प्रोडक्शन लेबर, साऊंड हेल्पर, लाईट हेल्पर, टेक्निकल सपोर्ट, स्थानिक डबिंग आर्टीस्ट, वॉटरबॉय या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार निर्मिती होते.
              चित्रपट क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या स्थानिक कलाकारांना मिळालेली संधी, कलाकरांना दळण–वळणासाठी आवश्यक असलेली वाहतूक व्यवस्था, सर्वांना जेवणासाठी सातारी केटरर्स या माध्यमांतुनही अनेक तरुणांच्या हाताला काम मिळते. ज्या गावामध्ये चित्रीकरण आहे तेथील स्थानिक विकासाला मदत, चित्रीकरणाच्या मोबदल्यात ग्रामपंचायतीला आर्थिक स्वरूपात मदत देणे यामुळे तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नामध्ये वाढ होते. त्याचसोबत चित्रीकरणाच्या निमित्ताने जिल्ह्यात येणारे, चित्रीकरण पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनामध्ये झालेली लक्षणील वाढ, अशा विविधांगी स्वरुपाचा फायदा जिल्ह्याला होतो.
या नियम व अटींसहीत परवानगी.

● चित्रीकरण प्रक्रियेमध्ये सामील असणाऱ्या प्रत्येकाने मास्क आणि पूर्ण शूटींग दरम्यान ग्लोज वापरणे बंधनकारक.
●चित्रीकरणाच्या संपुर्ण प्रक्रियेदरम्यान सामाजिक अंतर पाळणे सक्तीचे.
● हस्तांदोलन, मिठी मारणे अशा प्रकारची सर्व कृत्ये करणेस मनाई.
● दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी एक मीटर अंतर.
●65 वर्षावरील व्यक्तींना चित्रीकरण प्रक्रियेत समाविष्ट करणेस मनाई.
●चित्रीकरण दरम्यान लग्न समारंभ, पुजा, सण, उत्सव, सामुहिक नृत्ये अशा गोष्टी करण्यास मज्जाव.
●केश रचना व मेकअपसाठी डिस्पोजेबल वस्तु वापरणे.
●चित्रीकरणाचे ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हॅन्डवॉश, सॅनिटायझर, यांची प्रवेशद्वारावर व्यवस्था बंधनकारक.
●चित्रीकरण दरम्यान वापरात येणारे सर्व साहित्य उदा. – कॅमेरा, रिमोट, लाईट स्विच, स्क्रिप्ट पॅड, माईक, इलेक्ट्रिक सिस्टम इ. सर्व साहित्य वापरापूर्वी व वापरानंतर सॅनिटाईज करणे बंधनकारक.

            सातारा ,वाई, महाबळेश्वर हा परिसर नेहमीच हिंदी सिनेमांच्या आकर्षणाचा विषय राहिला आहे ,मराठी सिनेमे तसे मागे नव्हतेच सातारा जिल्ह्याने देखील चित्रपटसृष्टीला दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री, गायक, वादक, लेखक यांच्या रुपाने हिरे दिले. यामध्ये सिनेअभिनेते सयाजी शिंदे, किरण माने, श्वेता शिंदे तसेच नवोदित कलाकार सागर कारंडे, संतोष साळुंखे आहेत. पटकथा लेखक प्रताप गंगवणे, अरुण गोडबोले, तेजपाल वाघ हे मान्यवर देखील याच मातीने दिले.वास्तविक सातारा सांगली आणि कोल्हापूर ही पूर्वीपासून मराठी-हिंदी चित्रपटांच्या चित्रीकरणाचे केंद्र होते. याच ठिकाणी बहुतेक चित्रपटांचे चित्रीकरण केले जाई. ऐतिहासिक चित्रपटांसाठी लागणारी भरपूर लोकेशन्स, ग्रामीण संस्कृती या ठिकाणी आहे. त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्राचा लढ्यामुळे एकीकडे राज्यांच्या अस्मितांना खतपाणी मिळत गेले. सोबत नव्याने काही प्रश्न उभे राहिले. आजुबाजूच्या लोकेशन्समध्ये अनेक समस्या किंवा म्हणावी तेवढी स्पेस, बघ्यांची गर्दी यामुळे आपसूकच चित्रीकरणासाठी पश्चिम महाराष्ट्र हे मुख्य केंद्र बनले. सद्य स्थितीतही कोरोनामुळे मुंबईमधील चित्रीकरण पूर्णतः बंद आहे. दूरचित्रवाणी वाहिन्या, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, छोटे-मोठे व्यवसायिक यांचा होत असलेला तोटा लक्षात घेऊन चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा या भागाकडे वळत आहे.
चित्रीकरणामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराचे मोठे क्षेत्र सातारा जिल्ह्यात आहे. कलाकार, शुटींग लोकेशन्स, हॉटेल्स, केटरिंग, वाहतूक व्यवसाय आणि त्याच्याशी जोडलेले अनेक व्यवसाय इथे आहेत. सध्या कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे हे क्षेत्र मोडकळीस आलेले आहे. असे असताना या व्यवसायाला चालना देण्यासाठी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी चित्रीकरणासाठी योग्य ती खबरदारी घेऊन परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातीला हा पहिला निर्णय ठरला आहे. या निर्णयामुळे चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचे कौतुक होत आहे. अनेक चित्रपट निर्माते आता सातारची वाट धरत असल्याने इथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. कलाक्षेत्रातील हा सातारा पॅटर्न चित्रपट क्षेत्रातील सर्वांसाठी आशादायक ठरत आहे.                      
– तेजपाल वाघ (पटकथाकार)
              होय, तुम्ही सातारा जिल्ह्यात कुठेही शूटिंग करू शकता. सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी त्यासाठी परवानगी दिली आहे. केवळ आता चित्रपट-मालिका क्षेत्रातील सर्व निर्मिती संस्था आणि दिग्दर्शकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. नुकतंच आम्ही ‘टोटल हुबलाक’ या मालिकेचे चित्रीकरण आम्ही सुरू केले आहे. तुम्हाला ही तुमच्या चित्रपट, मालिका आणि वेबसिरीजचे चित्रीकरण सुरू करण्यास परवानगी मिळेल. लवकरात लवकर या आणि आता कास, ठोसेघर, बामणोलीच्या दर्याखोर्यांत तसेच माण खटावच्या माळरानांमध्ये पुन्हा एकदा आवाज घुमूद्यात : लाईट, कॅमेरा, अॅक्शन !!!
  -किरण माने (अभिनेते)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेशोत्सव आता महाराष्ट्र महोत्सव:पुण्यात गणेश मंडळांकडून जल्लोष

पुणे: कसबा विधानसभेचे आमदार हेमंत रासने यांच्या मागणीनुसार आज...

पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. १० : पुणे-नाशिक...

‘बालभारती’ची नवीन सुसज्ज इमारत लवकरच:शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि.१० : ‘बालभारती’ची मुख्य इमारत अत्यंत कमकुवत झाल्यामुळे...

हिंजवडीकरांच्या समस्या सोडविण्यासाठी नियोजनाचा बृहत आराखडा सादर करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि.१०- पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात वाहतूक कोंडी, अतिक्रमण,...