– लेखक मधू पोतदार यांचे प्रतिपादन
पुणे :
‘जणू परकाया प्रवेश केल्याप्रमाणे स्त्री भावना जाणून स्त्रीच्या आयुष्यातील सर्वच प्रसंगांवर केलेले गीतलेखन हे पी. सावळाराम यांच्या गीतलेखनाचे बलस्थान होते. बालगंधर्व यांनी स्त्री अभिनयाने जी मोहिनी महाराष्ट्रावर टाकली त्या मोहिनीशीच या गीतलेखनाची तुलना करता येईल,’ असे प्रतिपादन लेखक मधू पोतदार यांनी केले.
‘एक कवी-एक भाषा’ या ‘रसिक मित्र मंडळ’ आयोजित मासिक व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘रसिक मित्र मंडळा’चे संस्थापक अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला, कवी प्रदीप निफाडकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
हा कार्यक्रम पत्रकार संघ सभागृहात शुक्रवारी सायंकाळी झाला.
मधू पोतदार म्हणाले, ‘ग्रामीण भागातून येऊन धडपड करीत पी. सावळाराम यांना सूर सापडला तो वसंत प्रभू या संगीतकाराच्या भेटीमुळे. ‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का, जा मुली दिल्या घरी तु सुखी रहा’ या गीताने पी. सावळाराम, वसंत प्रभू आणि लता मंगेशकर प्रसिद्धीच्या शिखरावर पोचले.’ हे गीत मंगलाष्टकाइतके लोकप्रिय झाले. त्या रेकॉर्डस्चा काळा बाजार झाला !
पुढे 52 चित्रपटांना मराठी चित्रपटांच्या सुवर्णकाळातच गीतलेखन करताना पी. सावळाराम यांनी मागे वळून पाहिले नाही. स्त्रियांच्या भावना ओळखून स्त्री-जीवनातील जवळजवळ प्रत्येक प्रसंगावर गीते लिहिणे हे बलस्थान ठरले. त्यांच्या गीतातील स्त्री अबोल-मुग्ध नव्हती, तर सुशिक्षित, कुटुंबवत्सल, नाती आणि संस्कृती जपणारी होती.
सौंदर्य हे स्त्रीच्या रंगात नाही, तर अंतरंगात आहे, असे त्यांनी महाविद्यालयीन काळातील ‘काळा गुलाब’ कवितेत लिहून माधव ज्युलियन यांना प्रभावित केले होते. गीतांचा मुखडा सुंदर असावा, असा मंत्र वसंत प्रभू यांनी सावळाराम यांना दिला, तर अंतरा सुंदर करण्याचा सल्ला दिनकर द. पाटील यांनी दिला’, असे मधू पोतदार यांनी सांगितले.