“अज्ञेय’ हे हिंदीतील क्रांतिकारी कवी : प्रा. महेंद्र ठाकूरदास यांचे प्रतिपादन
पुणे :
‘अज्ञेय ‘हे हिंदीतील जुने विषय, छंद, रचना यांच्यात बदल घडविणारे क्रांतिकारी होते . प्रत्यक्ष जीवनात क्रांतिकारक असणाऱ्या ‘अज्ञेय’ यांनी कवितेतही क्रांती घडवली ‘,असे प्रतिपादन हिंदी साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. महेंद्र ठाकूरदास यांनी केले.
‘रसिक मित्र मंडळ ‘ आयोजित ‘एक कवी -एक भाषा ‘ व्याख्यानमालेत त्यांनी हे प्रतिपादन केले . ही मासिक व्याख्यानमाला असून प्रा. महेंद्र ठाकूरदास यांनी यावेळी 43 वे व्याख्यान पुष्प गुंफले .
यावेळी व्यासपीठावर ‘रसिक मित्र मंडळ ‘चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला ,कवी प्रदीप निफाडकर उपस्थित होते . शुक्रवारी सायंकाळी पुणे श्रमिक पत्रकारसंघात झालेल्या या कार्यक्रमाला पुणेकरांची चांगली उपस्थिती होती .
प्रा. डॉ . महेंद्र ठाकूरदास म्हणाले ,’ कवी अज्ञेय ‘ यांनी क्रांतिकारी चळवळीत भाग घेतला . तुरुंगवास भोगला . वयाच्या वीसाव्या वर्षीच तुरुंगात असताना लेखन करणाऱ्या ‘अज्ञेय ‘ यांनी पुढे हिंदी कवितेच्या प्रांतातही क्रांतिकारक बदल घडवले .’ भाव ‘ हा आधार न मानता ,त्यांनी ‘अनुभव ‘ हा लेखनाचा आधार मानला . त्यांच्या लिखाणावर त्या दृष्टीने प्रसिद्ध कवी टी . एस . इलियट यांचा प्रभाव होता . मानवतावादाचा प्रभाव देखील त्यांच्या कवितेवर दिसतो . ‘अज्ञेय ‘ यांच्या दोन आणि चार ओळीच्या ‘क्षणिका ‘ देखील वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या .
सुरेशचंद्र सुरतवाला यांनी स्वागत केले . प्रदीप निफाडकर यांनी आभार मानले .