मुंबई- नागपूरहून मुंबईला येणारी ‘दुरांतो एक्स्प्रेस’आज पहाटे २० फुट लांब टेकडीवर जाऊन आदळल्यानं एक्सप्रेसचे नऊ डबे घसरले. आसनगाव- वाशिंददरम्यान हा अपघात झाला असून सुदैवानं डबे जागीच थांबल्यानं मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या अपघातामुळे कल्याण-कसारामार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
सकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना आसनगाव-वासिंद रेल्वे स्थानकादरम्यान घडली. दुर्घटनेत ‘दुरांतो एक्स्प्रेस’च्या इंजिनासह नऊ डबे रुळावरून घसरले. एक्सप्रसेने २० फुट लांब टेकडीला जोरदार धडक दिली. त्यामुळे एक्सप्रेसचे नऊ डबे घसरले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे वरच्या बर्थवर झोपलेले प्रवासी खाली कोसळले. त्यामुळे अनेकांना मुका मार लागला. सुदैवानं या अपघातानंतरही डबे जागीच थांबल्यानं मोठा अनर्थ टळला. अपघातात काही जण जखमी झाले असून त्यांना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रेल्वेचे डबे बाजूला करण्यास सहा ते सात तास लागणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान , या अपघाताचा मुंबईच्या लोकल सेवेवर परिणाम झाला असून मुंबईला येणाऱ्या लोकल तब्बल अर्धा तास उशिराने धावत आहेत. कसारा आणि आसनगाव लोकल केवळ टिटवाळ्यापर्यंत चालविण्यात येत असल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं. त्यामुळे ऐन पावसात लोकलचा खोळंबा झाल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत असून अनेक रेल्वेस्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. याशिवाय नागपूरहून येणाऱ्या विदर्भ, अमरावती आणि सेवाग्राम एक्सप्रेसही रखडल्या आहेत.
‘दुरांतो’चे इंजिन आणि त्यामागचे ए-१, ए-२,ए-३, ए-४ हे डबे घसरले आहेत. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेल्याने अपघात झाल्याचाही अंदाज वर्तविण्यात येत आहे.
प्रवाशांसाठी हेल्पलाइन नंबरः
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- २२६९ ४०४०
ठाणे – २५३३ ४८४०
कल्याण- २३११ ४९९
दादर – २४११ ४८३६
नागपूर – २५६४ ३४२