पुणे-उद्योगमहर्षी रसिकलाल एम.धारीवाल आणि प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक सुरज बडजात्या यांना
यंदाचा पहिला प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पातळीवरील ‘पुलकभूषण’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. देशातील प्रतिष्ठेचा
हा पुरस्कार रविवार दि. 21 ऑक्टोबर 2018 रोजी सायं. 4 वाजता दिगंबर जैन मुनिश्री प.पु. 108 पुलकसागरजी
महाराज यांच्या मंगल उपस्थितीत धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ,
कर्वे नगर, पुणे येथे समारंभपूर्वक दिला जाणार आहे. चांदीच्या फ्रेममधील मानपत्र, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ असे
पुरस्काराचे स्वरूप आहे अशी माहिती सकल जैन वर्षायोग समितीचे कार्याअध्यक्ष मिलिंद फडे व उपाध्यक्ष चकोर
गांधी यांनी दिली . या प्रसंगी समितीचे सचीव जितेंद्र शहा आणि सहचिटणीस संजय नाईक उपस्थित होते .
राष्ट्रीय एकात्मता व धार्मिक सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी केलेले प्रयत्न, शाकाहार-अहिंसा या मानवी
मुल्यांशी असणारी वैचारिक बांधिलकी, समाजात सातत्याने पायाभूत व दिशादर्शक काम, समाजातील दुर्बल घटकांना
शैक्षणिक व वैद्यकीय साहाय्य देण्यासाठी संस्था व सुविधांची उभारणी अशा विविध निकषांवर आधारित दरवर्षी दोन
स्त्री अथवा पुरूष व्यक्तींना राष्ट्रीय पातळीवरील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जाणार आहे. कोणताही धर्म, प्रांत, भाषा,
लिंग याचा भेद न करता हा पुरस्कार दरवर्षी घोषित होऊन मुनिश्री पुलकसागर महाराज यांच्या दरवर्षी होणार्या
चातुर्मास स्थळी या पुरस्काराचे वितरण केले जाईल.
रसिकलाल एम. धारीवाल – केवळ जैनच नव्हे तर सर्वच धर्मियांमध्ये आस्था बाळगणारे दानशुर
उद्योगमहर्षी हा नावलौकिक मिळवलेले रसिकलाल एम. धारीवाल यांनी उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय,
धर्मसंस्कार अशा विविध क्षेत्रात सातत्याने महत्वाचे योगदान दिले. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे त्यांचा जन्म
1 मार्च 1939 ला झाला. वडिल माणिकचंद यांच्या अकाली निधनानंतर मातोश्री श्रीमती मदनबाई यांच्या
मार्गदर्शनाखाली त्यांनी खडतर जीवन प्रवास सुरू केला. मात्र उद्यमशीलता, कर्तबगारी, जिद्द, दूरदृष्टी आणि धार्मिक
संस्कार या पंचसूत्रीच्या आधारे त्यांनी सर्वच क्षेत्रात अव्वल स्थान मिळविले. त्यांनी उभारलेल्या माणिकचंद उद्योग
समुहाने देशात मानाचे स्थान मिळविले आहे. पानमसाला, तंबाखू उत्पादने, माउथ फ्रेशनर, इलेक्ट्रिकल स्विचेस,
ऑफसेट प्रिंटिंग, फ्लेग्जिबल पॅकिंग, बांधकाम व्यवसाय, पवनचक्या, ऑक्सिरिच मिनरल वॉटर, चहा आणि काडेपेटी
अशा महत्वपूर्ण क्षेत्रात त्यांच्या सर्व उत्पादनांनी केवळ दबदबा निर्माण केला असे नाही तर गुणवत्तेवर सदैव भर
देऊन त्यांनी सर्व उत्पादने सदैव अग्रेसर ठेवली. त्यांचा व्यवसाय पुणे, दिल्ली, मुंबई, बैंगलोर, हैद्राबाद, बडोदा आणि
आसाम येथे विस्तारला आहे. देशामध्ये अनेक उत्पादनांची त्यांचे वितरक म्हणून मोठी वितरण व्यवस्था त्यांनी
उभारली. त्यांची अनेक उत्पादने 50 हून अधिक देशात निर्यात होतात. ‘उंचे लोग-उंची पसंद’ हे त्यांचे ब्रँड नेम सर्वत्र
लोकप्रिय झाले.
उद्योग महर्षी रसिकलाल एम. धारीवाल यांनी उद्योगाप्रमाणेच सामाजिक जबाबदारीची जाण ठेऊन अनेक
समाजोपयोगी उपक्रम उभे केले. तसेच समाजासाठी चांगले काम करणार्या संस्थांना भक्कम आर्थिक पाठबळ दिले.
शिक्षण आणि आरोग्यसेवा या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान स्पृहणीय आहे. कायमस्वरूपी समाजोपयोगी कामे
उभारतानाच भूकंप, पूर अशा राष्ट्रीय नैसर्गिक आपत्तीच्यावेळी देखील माणिकचंद उद्योगसमूह मदत करण्यासाठी
सदैव पुढे सरसावला. लाखो गरजू, तरूण नागरिकांच्या चेहर्यावरील हास्य व समाधान हेच उद्योगसमूहाचे यश असे
ते मानत राहिले.
शैक्षणिक पातळीवर त्यांनी अनेक संस्था उभारल्या तसेच हजारो गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या मिळण्याची
व्यवस्था केली. शिरूर, पुणे येथे अनेक महत्वपूर्ण शिक्षण संस्था त्यांनी निर्माण केल्या. त्याचबरोबर पुण्यात मुलींचे
वसतीगृह, चांदवड (नाशिक) व तळेगाव येथे मुलांचे वसतीगृह उभारून त्यांनी विद्यार्थ्यांची मोठी सोय केली.
त्याचप्रमाणे शिरूर, पावापुरी (बिहार), चिंचवड, गणेगाव, उदयपूर, अलिगड, पुणे, उज्जैन, वैजापूर, इंदौर अशा विविध
ठिकाणच्या शिक्षण संस्थांचे देखील माणिकचंद उद्योगसमूह आधारस्तंभ आहेत. गरजू विद्यार्थ्यांना चांगली
शिष्यवृत्ती देता यावी यासाठी त्यांनी आठ कोटी रुपयांचा ट्रस्ट निर्माण केला.
वैद्यकीय क्षेत्रात गरजू रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी त्यांनी अनेक प्रकल्प उभारले. माणिकचंद उद्योग
समुहाने गरीब रुग्णांसाठी माफक दरात अथवा निःशुल्क वैद्यकीय सेवा देण्यासाठी अद्ययावत इस्पितळांची निर्मिती
केली. तसेच देशातील अनेक इस्पितळांना मोठा आर्थिक सहयोग दिला. त्यातूनच पुण्यात नर्सिंग कॉलेज व होस्टेलही
सुरू झाले. पुणे, नगर, औरंगाबाद, अलिगड, पालिठाणा अशा अनेक ठिकाणी उभारण्यात आलेली हॉस्पिटल्स् अद्ययावत
करण्यासाठी त्यांनी मोठे आर्थिक पाठबळ दिले.
सामाजिक पातळीवर लातूर व गुजरातचा भूकंप,आंध्रमधील वादळ, कारगिल युद्ध अशा प्रत्येक वेळी
माणिकचंद उद्योगसमूह मदतीसाठी पुढे सरसावला. अलिगड व पानशेत येथे वृद्धाश्रमही उभारलेले.
धार्मिक पातळीवर, पालिठाना येथील शत्रूंजय तिर्थ, शिखरजी येथे धर्मशाळा, मध्यप्रदेश, झारखंड, गुजरात,
राजस्थान, आंध्रप्रदेश आदी राज्यांमधील धार्मिक स्थळांना आर्थिक सहाय्य करून त्यांनी मोठे योगदान दिले.
सुरज बडजात्या – 22 फेब्रुवारी 1965 मध्ये जन्मलेले सुरज बडजात्या यांनी शालेय व
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर चित्रपट सृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. ज्येष्ठ दिग्दर्शक
महेश भट यांचा ‘सारांश’, दिग्दर्शक हिरेंद्र नाग यांचा ‘अबोद’, टिव्ही सिरीयल ‘पेईंग गेस्ट’ आणि दिग्दर्शक एन. चंद्रा
यांच्या ‘प्रतिघात’ यामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम सुरू केले. याच काळात लेखक व दिग्दर्शक म्हणून
ही ते नावारूपास आले. ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘मै प्रेम की दिवानी हूँ’, ‘विवाह’
आणि ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटांच्या दिग्दर्शनात त्यांनी आपल्यातील गुणांची चमक दाखवली. राजश्री
प्रोडक्शन समवेत त्यांनी अनेक टिव्ही मालिकांमध्ये प्रभावशाली दिग्दर्शक म्हणून काम केले.
1989 मध्ये ‘मैने प्यार किया’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट सुपरहिट ठरला. एवढेच नव्हे तर
गेल्या 70 वर्षातील देशातील 10 यशस्वी चित्रपटांमध्ये त्याचा समावेश झाला. या चित्रपटामुळे त्यांना अनेक पुरस्कार
मिळाले. 1994 मध्ये राजश्री प्रोडक्शनचा त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाने केवळ रौप्य
महोत्सवच साजरा केला असे नाही तर देशातील पहिल्या 10 चित्रपटांमध्ये स्थान मिळवले. या चित्रपटाने तब्बल 5
फिल्मफेअर अवॉर्ड मिळवले. तसेच अन्य पुरस्कारांप्रमाणेच सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक व पटकथा संवाद लेखक म्हणून
त्यांना गौरवले गेले.
1999 मध्ये सुरज बडजात्यांनी कथा, संवाद आणि दिग्दर्शित केलेला ‘हम साथ साथ है’ या राजश्री
प्रौडक्शनच्या चित्रपटाने देखील अनेक विक्रम केले. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा तिसरा चित्रपट कौटुंबिक चित्रपट
म्हणून गाजला. 2006 मध्ये ‘विवाह’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट देशभर गाजला. या चित्रपटाने देशात 25
ठिकाणी रौप्य महोत्सव साजरा केला.
‘प्रेम रतन धन पायो’ हा 2015 मधील प्रदर्शित झालेला आणि सुरज बडजात्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट
देशभर हाऊसफूल होत राहिला. या चित्रपटाद्वारे सुरज बडजात्या आणि अभिनेता सलमान खान 18 वर्षानंतर एकत्र
आले होते. चित्रपटाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक कलेक्शन करणारा चित्रपट ही याची ख्याती बनली.
कौटुंबिक आणि चांगले संस्कार करणार्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून सुरज बडजात्यांनी नावलौकिक
मिळवला. साधेे, खुसखूशीत निखळ मनोरंजन करणार्या चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यात सुरज बडजात्या नेहमी
आघाडीवर राहिलेत. कुशाग्र बुद्धीमत्ता, परिस्थितीचे भान आणि कुटुंबसंस्था बळकट होण्यासाठी संस्कारित दृष्टीकोन
देणारे सुरज बडजात्या हे हिंदी चित्रपट सृष्टीला मिळालेले मौलिक रत्नच आहेत.