पुणे-ज्या घरात मुलीचा जन्म होतो ते घर स्वर्गासमान असते. केवळ माहेरचे नव्हे तर सासरचेही नाव सार्थक करते. डॉ. कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, इंदीरा गांधी, प्रतिभा पाटील यांची उदाहरण पाहिले तर मुली कोणत्याच ठिकाणी कमी नसतात. मात्र हल्ली मुलींची आईच्या गर्भातच हत्या केली जात आहे. मुली या मांगल्याचे प्रतीक असतात. ज्याप्रमाणे मंगल कलशाचा अवमान करणे हे पाप असते, त्याचप्रमाणे मुलींचा अपमान करणे हे महापाप असते. स्त्रीभ्रूण हत्या हे संत हत्येसारखे पाप असते. अशा पापाचे भागीदार होण्यापेक्षा मुलींचा सन्मान करा, अशी शिकवण मुनिश्री प.पु. 108 पुलकसागर महाराज यांनी रविवारी दिली.
सकल जैन वर्षा योग समिती, पुणेतर्फे चातुर्मासानिमित्त ज्ञानगंगा महोत्सवाचे धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत मुनिश्री 8वे पुष्प गुंफतांना बोलत होते. यावेळी मुनिश्री यांनी ‘बेटी बचाव’ या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी श्वेतांबर जैन मुनिश्री त्रिलोक प्रभाजी महाराज यांचा ही चार्तुमास पुण्यात चालू असून मुनिश्री पुलकसागरजींचे प्रवचन ऐकण्यासाठी ते आवर्जून उपस्थित होते. तसेच माजी केंद्रीय रेल्वे मंत्री व पुण्याचे माजी खासदार व नेते सुरेश कलमाडी व सौ. मीरा कलमाडी यांनी देखील याप्रसंगी उपस्थित राहून मुनिश्रींना श्रीफळ अर्पण करून आशिर्वाद घेतले. मुनिश्रींनी त्यांना त्यांची पुस्तके भेट दिली. मंचावर समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, उपाध्यक्ष अरविंद जैन, उद्योजक पोपटलाल ओस्तवाल, सौ. नीता संजय घोडावत, सौ. रेखा सतिश मगर, सौ. इंदू जैन, सौ. प्रभा जैन, सौ. भारती किशोर पाटे, सौ. निधी अरविंद जैन, पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे अध्यक्ष विरू जैन, समितीचे उपाध्यक्ष अजित पाटील, सुदीन खोत, सुजाता शहा, संजय नाईक, विरकुमार शहा, तारका फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष कांटे आदी उपस्थित होते. सुरेश कलमाडी मंडपातून परततांना त्यांना भेटण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
प्रारंभी दीपप्रज्वललाने कार्यक्रमास सुरूवात झाली. पूजा फडे मेहता व अनुग्रह ग्रुप आणि जैन जागृती सखी मंचच्या महिलांनी मंगलाचरण सादर केले. समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, उपाध्यक्ष अरविंद जैन यांनी मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार केला. मिलिंद फडे यांनी प्रास्ताविक केले. शोभा धारिवाल यांनी आर एम धारिवाल फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. कार्यक्रमास भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
प्रवचनात मुनिश्री पुढे म्हणाले, आज समाजात मुलींसोबत दुर्व्यवहार वाढला आहे. आज अनेक घरांमध्ये कत्तलखाना सुरू आहे. ज्याप्रमाणे कत्तलखाण्यात जनावरांची हत्या केली जाते. त्याचप्रमाणे गर्भपाताद्वारे मुलींची हत्या केली जाते. एकीकडे मुलींचे पूजन केले जाते, दुसरीकडे स्त्रीभ्रूण हत्या केली जाते. केवळ अशिक्षित, गरीब, मागसलेल्या जातीतच नव्हे, तर उच्चशिक्षित, सधन, उच्चवर्णीयांमध्येही हे कुकर्म केले जाते. गर्भातच मुलींची हत्या करणार्या व्यक्तींना अतिथी अवमान, शरणार्थीसोबत विश्वासघात, दीन-हीन-अनाथची हत्या आणि निरपराध स्वकीय हत्या असे चार पाप त्या व्यक्तींना लागते” असे मुनिश्री म्हणाले.
मुलगा कुलदीपक असतो, तो वंश पुढे नेतो असा सर्वसामान्यपणे समज असतो. परंतु वंश मुलांनी नाही चालत. वंश चालविण्यासाठी अंश नव्हे तर परमहंसची आवश्यकता असते. महावीर, स्वामी विवेकानंद, विनोबा भावे यांनी आपल्या आयुष्यात कधी लग्न केले नाही, परंतु आजही शेकडो लोक स्वत: अभिमानपूर्वक त्यांचे वंशज म्हणवतात. मग केवळ याकारणासाठी मुलींना गर्भात का मारले जाते? मुलीदेखील तुमचे, तुमच्या वंशाचे नाव सार्थक करू शकतात. इतिहासात मुलींच्या, महिलांच्या शौर्याची, यशाची, त्यागाची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. त्याच प्रमाणे भविष्यात तुमच्या मुलीदेखील चांगले काम करू शकतील. त्यामुळे त्यांची हत्या न करता, त्यांचा सम्मान करा, असेही मुनिश्रींनी सांगितले.
हा ज्ञानगंगा महोत्सव तीन सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी 8.30 ते 10 यावेळेत धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे होणार आहे. सोमवारी (दि.20) सकाळी 8.30 वाजता ‘राष्ट्रीय एकात्मता’ याविषयावर मुनिश्री मार्गदर्शन करतील.
मुनिश्रींच्या चातुर्मासानिमित्त रसिकलाल एम. धारिवाल फाउंडेशनतर्फे 3 सप्टेंबरपर्यंत रक्तदान महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी मोठी धारिवाल फाउंडेशनची बसही येथे उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच महिलांसाठी कॅन्सर डिटेक्शन चाचणीची सोय देखील येथे उपलब्ध करून देण्यात आली. त्यामध्ये सुमारे 250 महिलांनी चाचणीचा लाभ घेतला.