पुणे – जगात अनेक देश हे महाराष्ट्रापेक्षा लोकसंख्येने लहान असूनही तेथील लोक स्थानिक भाषेतच व्यवहार करत आहेत. पण जागतिकीकरणामुळे स्थानिक भाषा. संस्कृतीला धोका निर्माण झाला असून वाढती पिढीही इंग्रजीला बळी पडत आहे हे दुर्दैव आहे. इंग्रजी बोलण्याच्या प्रतिष्ठेपोटी मराठी भाषा बोलण्याचा न्यूनगंड बाळगू नका असे परखड आवाहन तुकाराम महाराजांच्या अभंगांवर पीएचडी करणारे बिशप थॉमस डाबरे यांनी आज येथे केले.
पत्रकार भवन येथे झालेल्या मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणा-या “मराठी रत्न पुरस्कार” वितरण समारंभात बिशप डाबरे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पवार होते. ऍस्पयार नॉलेज ऍण्ड स्कील्स प्रा. लिचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गांधी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण प्र. वाळिंबे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यंदाचे मराठी रत्न पुरस्कार चित्रपट विषयक १४ पुस्तके लिहिणारे मधू पोतदार, अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या आणि माहेर मासिकाच्या कार्यकारी संपादिका सुजाता देशमुख आणि मुक्त पत्रकार देवीदास देशपांडे यांनी देण्यात आले. पुणेरी पगडी, पाच हजार रूपये रोख, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुणे या विद्येच्या माहेरी, राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत लोक इंग्रजीतून बोलणेच पसंत करतात अशी खंत व्यक्त करून थॉमस डाबरे म्हणाले, मी पुण्याचा, माझी मातृभाषा मराठी, त्यामुळेच मी तुकारामांचे निवड अभंग संशोधनासाठी निवडले. हे अभंग मी व्हॅटिकनसिटीत पोचवले याचा मला अभिमान आहे. मराठी भाषेतून जे भावतरंग मनात उमटतात, हृदयाला साद घालतात असे तरंग इतर कोणत्याही भाषेतून बोलले तरी उमटत नाहीत. व्यक्ती आणि तिची मातृभाषा यांचा विलक्षण संयोग असून तो व्यक्तीगत अस्मितेचा भाग आहे. मी म्हणजे मराठी भाषा या अस्मितेचं ते प्रकटरूप, मूर्तस्वरूप आहे. त्यामुळे आपण जेथे रहातो तेथे मराठीचाच वापर करू या असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
उल्हास पवार म्हणाले, माजी पंतप्रधान नरसिंहराव यांना देशातील ९ आणि परदेशी तीन भाषा येत होत्या. त्यांनी ह. ना. आपटे यांच्या कादंबरीचे तेलगू भाषेत अनुवाद केला होता. ते पुस्तक खूपच गाजलं असं खुद्द नरसिंहराव यांनीच कराडच्या मराठी साहित्य संमेलनाच्यावेळी सांगितलं होतं. ट्रान्सलेशन याचा अर्थ एका जीवाचं दुस-या जीवात विलिनीकरण. भाषा ही संस्कृती वृद्धींगत करते, माणसं जोडण्याचं काम करते, एका अर्थी सानेगुरूजींच्या आंतर भारतीच्या निर्माणाचं काम करते. त्यामुळेच इतर भाषेतील पुस्तकांचे मराठीत अनुवाद होतात त्यापेक्षा जास्त समृद्ध मराठी साहित्यांचे अनुवाद हे इतर भाषेत झाले पाहिजेत. मराठी भाषा वृद्धींगत होईल, तिची लोकप्रियताही वाढेल आणि शंभर टक्के जगात पोचेल यात शंका नाही असा विश्वास त्यांनी शेवटी केला. संजय गांधी म्हणाले, आम्ही मुलांना कौशल्य विकासाचे शिक्षण हे मराठी भाषेतूनच देतो. आजपर्यंत महाराष्ट्रातील चाळीस हजार मुलांना असे प्रशिक्षण दिले असून आज मितीला सात हजार मुले ही आयटी कंपन्यांमध्ये लाखातील पॅकेज घेऊन काम करत आहेत. या सर्वांनाच मराठीतूनच आम्ही शिकवतो, कारण इंग्रजीतून त्यांना महिती मिळेल पण ज्ञान मिळणार नाही. सर्वांना मा मातृभाषेतून शिकवले तर मुले लवकर आणि सहजपणे शिकू शकतात असा अनुभव आहे.
यावेळी पुरस्कार्थींच्यावतीने बोलताना सुजाता देशमुख यांनी सांगितले की, भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा अन्योन्य संबंध असून दोन संस्कृतीतील संवादाचा भाषा हा सेतू असतो. मधू पोतदार म्हणाले, जगात वीस लाखांपेक्षा जास्त लोक एकच भाषा बोलतात अशा भाषांची संख्या १५ असून त्यात मराठीचा अकरावा नंबर आहे. ही अभिमानाची बाब असूनही आपण वर्षातून एक दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करून मराठी भाषेला परकं करतोय. मराठी भाषेत संतसाहित्य सारखे चिरंजीव साहित्य असल्याने धोका मराठी भाषेला नाही तर मराठीच्या बोलण्यातून कमी होत चाललेल्या बोली भाषा नष्ट होण्याचा आहे.
मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानचे श्रृती तिवारी, वैष्णवी टिळेकर, तन्मयी मेहेंदळे, सागर बाबर अस्मिता पाठक – राजे, अमोल बोरसे आदींचाही यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात तन्मयी मेहेंदळे यांनी सादर केलेल्या मराठी अभिमान गीताने झाली. कार्यक्रामाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन करताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष वाळिंबे यांनी मराठी भाषा संवर्धनाचे काम सन २००० पासून सुरू असून मराठी स्वाक्षरी करा, पाट्या मराठी लावा यासारख्या लहानलहान उपक्रमातून काम गेली अठरा वर्षे सुरू आहे. मराठी रत्न पुरस्कार म्हणजे मराठी भाषा वृद्धीसाठी यांनी केलेल्या कामासाठी प्रोत्साहन म्हणून दिलेले असल्याचे त्यांनी नमूद केले. शेवटी आभार प्रदर्शन करूणा पाटील यानी केले.