घरात राहा…सुरक्षित राहा ! (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

Date:

  • कोणी टाळ्या वाजवत होते, कोणी थाळी, कोणी शंखनाद तर कोणी घंटानाद. आसमंत नादमय झाला होता. एक लय होती…एक सूर होता आणि सर्वांच्या मनात कृतज्ञतेची भावना होती. डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय अशा अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी, पोलीस डिपार्टमेंट, शासन आणि जनतेची सेवा करणारे सर्वच…या सगळ्यांचे आभार मानायला हवेत, म्हणूनच देशभरातील तमाम जनता एकसाथ त्यांना मानवंदना देत होती. भारावून टाकणारा हा क्षण होता! २२ मार्चला जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माननीय पंतप्रधान मोदीजींनी भारतवासीयांना 1 दिवसाचा कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले, त्याला कारणच तसे होते…करोनाचे देशभरात वाढते रुग्ण. ही बाब चिंताजनक होती. आपण आता दुसऱ्या स्टेजमधून तिसऱ्या स्टेजमध्ये जात आहोत. त्यामुळे सतत सतर्क राहणे आणि काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे. 
आम्ही 25 फेब्रुवारीला परदेशवारी करून परत आलो होतो. एअरपोर्टवर आमचे चेकिंग झाले आणि त्यावेळी एक विशिष्ट फॉर्मही भरून घेतला होता. एवढ्या सगळ्या प्रवाशांचे फॉर्म भरून हे अधिकारी नक्की काय करत असतील, या प्रश्नाने भंडावून सोडले होते आणि त्याचे उत्तर काही दिवसांनी मिळालेही. 2-3 दिवसांनी महानगरपालिकेच्या डॉक्टर आणि त्यांची सहकारी घरी दत्त म्हणून हजर. ”तुम्ही परदेशात जाऊन आलात ना? तुमची चौकशी करायला आलो आहोत, इति…” मनात आलेला पहिला प्रश्न “यांना कसं कळलं? आणि यांचं काय काम आता?” त्या डॉक्टर नक्की महापालिकेतूच आल्या आहेत याची खातरजमा करून मग त्यांना घरात घेतलं. त्यांनी त्यांच्याकडची लिस्ट दाखवली, त्यात आम्हा चौघांची माहिती होती जी आम्ही एअरपोर्टवरील हेल्थ फॉर्ममध्ये भरली होती. तो फॉर्म का भरून घेतला गेला याची आता उकल झाली. डॉक्टरांनी आमच्या परदेशातील वास्तव्याबद्दल कसून चौकशी केली. आम्ही कुठे कुठे फिरलो आणि कुणाकडे राहिलो त्यांचेही पत्ते आणि संपर्क क्रमांक टिपून घेतले. आम्हालाही या सगळ्या गोष्टींचं खूप कौतुक आणि अभिमान वाटला…आपली शासकीय यंत्रणा किती सजग आणि सक्रिय आहे. हा किस्सा एवढ्यावरच थांबला नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी बरोब्बर 9.35 वाजता डॉक्टरांचा फोन – कुणाला काही करोनाची लक्षणे आहेत का??? आणि सलग 14 दिवस सातत्याने रोज सकाळी 9.35 वाजता (ही वेळ अजिबात चुकली नाही) डॉक्टर आम्हाला फोन करून आमची चौकशी करत होत्या. यासाठी आपल्या शासकीय यंत्रणेला आणि डॉक्टरांना सलाम.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपले माननीय मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री वेळोवेळी योग्य निर्णय घेत होतेच आणि घेत आहेतही. त्यातच एक मोठी ब्रेकिंग न्यूज आली- पुण्यातील एक दाम्पत्याला करोनाची लागण झाली, एवढेच नाही तर त्यांनी ज्या टॅक्सीने मुंबई-पुणे प्रवास केला त्या टॅक्सी ड्रायव्हरला सुद्धा करोनाची लागण…या बातमीने मात्र मुंबई, पुणेच काय तर अख्खा महाराष्ट्र हादरला. जिकडे तिकडे उलटसुलट चर्चा आणि अफवांचं पीक आलं होतं.
काही शाळा तर सरकारच्या सूचना यायच्या आधीच बंदही झाल्या. काही शाळांनी आपल्या परीक्षा पुढे ढकलल्या तर काही शाळांनी सुट्टी देऊन शाळा थेट जूनमध्ये उघडणार असल्याचे जाहीर केले. ज्या ज्या खाजगी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देता येणे शक्य होते, त्यांनी ते अमलात आणले. ट्रेन आणि बसमधील गर्दी कशी कमी होईल याकडे प्रशासन लक्ष देत होते. काही ठिकाणी लोकांना याचं गांभीर्य कळत नाही, हे लक्षात येताच जमावबंदीही लागू केली गेली. करोनाच्या रुग्णांची आकडेवारी दिसामाजी वाढत आहे. सगळ्या वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रांतून सूचना आणि माहिती मिळत आहेच. सोशल मीडियावरही मेसेजेस येत आहेत. क्षणोक्षणी तर यावर विनोदी क्लिप्सही टाकल्या गेल्या आहेत (ज्यांना याचं गांभीर्य बहुधा कळलं नसावं). मेडिकलच्या दुकानातून हँड सॅनिटायझर एक तर गायब तरी झालं आहे किंवा 50 रुपयांच्या बाटलीला तिप्पट पैसे मोजावे लागत आहेत; तीच गोष्ट मास्कच्या बाबतीत…अव्वाच्या सव्वा किमतीला ते काही जण विकत आहेत. मुलं तर मे महिन्याची सुट्टी असल्यासारखी खेळत आहेत. आपल्या पंतप्रधानांनी 22 मार्चच्या जनता कर्फ्युचं आवाहन केलं आणि हळूहळू सगळ्यांच्या लक्षात यायला लागलं त्यामागचं गांभीर्य. त्यात मुंबईची जीवनवाहिनी- लोकल पूर्णपणे बंद झाली. बसही फक्त अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी वर्ग तसेच बँक कर्मचाऱ्यांसाठीच.
घरात राहा… सुरक्षित राहा…31 मार्चपर्यंत लागू असलेली जमावबंदी. त्यात 24 मार्चला पंतप्रधानांनी पुन्हा जनतेला आवाहन केलं की आता अजून पुढचे 21 दिवस म्हणजे 14 एप्रिलपर्यंत सगळ्यांनी घरीच राहायचं आहे…संपूर्ण लॉकडाऊन…पूर्ण बातमी ऐकायच्या आधीच लोकांनी बाहेर धूम ठोकली आणि जीवनावश्यक वस्तू व मेडिकलच्या दुकानाबाहेर ही भली मोठी रांग लागली.
खरं तर या वस्तू मिळणार आहेतच, पण लोकांनी रस्त्यात उगाच फिरत बसू नये. अगदी अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा, अन्यथा घरात राहा…सुरक्षित राहा…!
  • पूर्णिमा नार्वेकर, दहिसर
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...