मास्कपुराण…(लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

Date:

हुश्श… आता खूप बरं आणि मोकळं मोकळं वाटतंय… सिडनी एअरपोर्टवर उतरताच तोंडावरचा मास्क काढला आणि एक दीर्घ मोकळा श्वास घेतला. मास्क पर्समध्ये ठेऊनच दिला लगेच. गेले काही दिवस हे मास्कपुराण चालूच होते. चीनला करोना व्हायरसचे रुग्ण सापडायला लागले, त्या पाठोपाठ केरळला ही एक संशयित म्हटल्यावर पोटात गोळाच आला. आमचा ऑस्ट्रेलियाला जायचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतसं करोना व्हायरसच्या बातम्यांनाही उधाण आलं होतं. दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांमध्ये भरच पडत होती. बऱ्याच देशामध्ये व्हायरस पसरल्याच्या बातम्या सतत येत होत्या. ऑस्ट्रेलियाला जाताना आमचा पहिला हॉल्ट हाँगकाँगला होता आणि तिकडे ले ओव्हर 1 2 तासांचा होता. हाँगकाँग ते सिडनी फ्लाईट संध्याकाळी 6.30 चे होते. मी, परेश, ओमकार, सासूबाई आणि माझी आतेबहीण ज्योती असे आम्ही 5 जण माझ्या भावाकडे, निलेशकडे जात होतो. करोना व्हायरसने मात्र आमच्या उत्साहावर विरजण टाकलं. सगळ्या मित्रमैत्रिणी आणि आप्तेष्टांकडून सूचना आणि सल्ल्यांचा भडिमार होत होता. माझी डॉक्टर मैत्रीण, डॉ. नीलम रेडकर हिला मी मास्कबद्दल विचारले. तिने सांगितले की शक्यतो एन 95 मास्क मिळाले तर घ्या, तेच जास्त सुरक्षित आहे. मग एन 95 मास्क कुठे मिळतील याची शोधमोहीम सुरू झाली. त्याच बरोबर एन 95 मास्क कसे धारण करायचे याचा यु ट्यूबवर व्हिडीओही बघून झाला. ज्योतीताई डोंबिवली तर आमची दहिसर-बोरिवलीला जवळ जवळ सगळी मेडिकलची दुकानं पालथी घालून झाली होती. ज्योती आणि मी व्हाट्सएप वर एकच चर्चा – _अगं आज मला नाही मिळालेत कुठे मास्क. आता उद्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन बघते._ दुसऱ्या दिवशी परत हाच मेसेज दोघींचाही रिपिट असायचा. कारण एन 95 हे मास्क कितीतरी मेडिकल दुकानदारांना माहीतच नव्हते; आणि जिकडे माहीत होते तिकडे नेमके ते आउट ऑफ स्टॉक होते. आता काय करायचं म्हणून ओंकारने अमेझॉन, फ्लिपकार्टवर आहेत का ते ऑनलाईन चेक करून पाहिले तर तिकडेही आउट ऑफ स्टॉक…करोनाच्या बातम्या तर दिवसेंदिवस नवीन काहीतरी घेऊनच येत होत्या. आमच्यातील उत्साहाचे वातावरण जाऊन आता भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जायचा दिवस उजाडला मग नाईलाजाने साधे मास्कच घ्यावे लागले. परेशला ऐनवेळी कुठून तरी एन 73 मास्क मिळाले. एन 95 नाहीतर एन 73…चला दुधाची तहान ताकावर भागवली, तशातला हा प्रकार.
मुंबई एअरपोर्ट टी 2 टर्मिनलवर बरेचसे प्रवासी आणि तिकडील कर्मचारी मास्क धारण करून होते. आम्हीही मग सुरक्षिततेसाठी मास्क लावला. सध्या तरी साधाच मास्क लावू या, मग हाँगकाँगला उतरल्यावर अधिक सुरक्षेसाठी एन 73 चा वापर करूया असं ठरलं. मास्क लावल्यावर काही काळासाठी मात्र गम्मत वाटली. लगेच आम्ही सगळ्यांनी सेल्फीही काढले! थोडा वेळ तसा बरा गेला मग मात्र अडचणीचे वाटू लागले. मुंबई ते हाँगकाँग या संपूर्ण विमान प्रवासात मास्क लावूनच राहावे लागले. करोनाच्या भीतीने बऱ्याच जणांनी विमान प्रवास रद्द केल्यामुळे बऱ्याच सीट्स रिकाम्या होत्या. त्यामुळे मुंबई-हाँगकाँग विमान प्रवास मस्त झोपून करता आला. हाँगकाँगला विमानतळावर सगळेच मास्कधारी होते. आम्ही सगळ्यांनी मग एन 73 मास्क धारण केला. चौफेर नजर फिरवली तर ठिकठिकाणी मास्कधारी. विविध प्रकारचे आणि विविध रंगाचे मास्क. सुरक्षा अधिकच कडक. सुरक्षा अधिकारी सर्वांचे टेम्परेचर चेक करत होते. कोणी संशयित आढळले तर त्याची अधिक तपासणी. गर्दी टाळण्यासाठी आम्ही एक कोपरा पकडून बसलो. आमचे सिडनीचे फ्लाईट संध्याकाळी 6.30 चे होते. 12 तास मास्क धारण करून एके ठिकाणी बसून राहायचे म्हणजे आमच्या काळची शाळेतली शिक्षाच जणू. खरं तर आम्हाला हाँगकाँगचा ट्रान्झिट व्हिसा मिळाला होता. 12 तासाच्या ‘ले ओव्हर’मध्ये हाँगकाँगला फिरायचं असं ठरवलं होतं; पण करोनाच्या भीतीने या सगळ्या प्लानवर पाणी पडलं आणि एके ठिकाणीच एअरपोर्टवर बसून राहायची वेळ आली. बसून बसून कंटाळा आला, जरा पाय मोकळे करावे म्हणून इकडे तिकडे एअरपोर्टवरच फिरलो. वेळ जाता जात नव्हता. त्यात अजून एका संकटाची भर पडली. आमचे फ्लाईट अजून 4 तास उशिरा होते म्हणजे संध्याकाळी 6.30 ला सुटणारे फ्लाईट आता रात्री 10.30 ला सुटणार होते. भाऊ आणि जान्हवी (वहिनी माझी) तसेच आम्ही सिडनीला ज्यांच्या घरी राहणार होतो त्या हेतल भाभींचीही मेसेजवरून सतत आमची चौकशी चालू होती. 16 तास एका जागी मास्क घालून बसून राहणे आता असह्य झाले होते आणि किंचित अस्वस्थही वाटत होते. त्यात आमच्या जवळील खाणे खाऊन खाऊन कंटाळा आला होता. पण एअरपोर्ट काहीही खाऊ नका, अशा सूचना सर्वांनीच दिल्या होत्या; त्यामुळे फक्त कॉफीवर समाधान मानावे लागले. प्रतिक्षेचा काळ संपला आणि हाँगकाँग ते सिडनीच्या फ्लाईटमध्ये आम्ही स्थानापन्न झालो. अजूनही या फ्लाईटमधील 12 तासांचा प्रवास हा मास्क घालूनच करायचा होता. बाई गं, सहनशक्तीचा अंतच म्हणा ना. अखेर फ्लाईट सिडनीला लँड झाले…बाहेर आलो…मास्क काढला…दीर्घ मोकळा श्वास घेतला!
© पूर्णिमा नार्वेकर, दहिसर
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...