पुणे- पुण्याला वर्षभर पिण्याचा पाणी पुरवठा होईल एवढी धरणे पाण्याने भरली आहेत, आणि महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे … या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादीत पाण्याचे राजकारण रंगले आहे. आयुक्त कुणालकुमार यांच्या दडपणाखाली राहणारे महापौर आणि भाजप सरकारच्या दडपणाखाली राहणारे आयुक्त आणि भाजपचे पालकमंत्री यांची मात्र या राजकारणात कोंडी झाली असल्याचे चित्र दिसत आहे .त्याच बरोबर सध्या तरी पुणेकरांचीही कोंडी होणार आहे . यापुढे जोरदार पाऊस झाला तर मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिकांची कोंडी होणार नाही असे स्पष्ट चित्र आहे .
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात म्हणजे पानशेत ,वरसगाव ,टेमघर आणि खडकवासला अशा चारही धरणात एकूण मिळून आज सायंकाळी ५ वाजता ५०.७७ टक्के एवढा पाणी साठा होता. म्हणजे तो १४ .८० टीएमसी एवढा होता . पुण्याला पिण्याच्या पाण्याची गरज पाहता तो वर्षभर रोज देता येईल एवढा आहे. असे असताना महापौरांनी शहराला होणारा पाणी पुरवठा सध्या होत असलेल्या पद्धतीप्रमाणे दिवसा आडच होईल असे धोरण २ दिवसापूर्वीच जाहीर केले होते. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापौरांची चांगलीच खरडपट्टी घेतल्याचे वृत्त आहे . महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि पिण्याला पुरेल एवढे पाणी देखील आहे मग कशाला पाणीकपात सुरु ठेवायची …? तातडीने रोजचा एकवेळ पाणीपुरवठा सुरु झाला पाहिजे असे आदेश अजित पवार यांनी त्यांना दिले आहेत . तर दुसरीकडे पाण्याच्या प्रश्नावरून भाजपने महापालिका आयुक्त यांच्याशी बोलणी करून ‘जैसे थे ‘ परिस्थिती ठेवा असे सांगितल्याने आणि आयुक्त हे राज्य शासनाच्या आदेशला जुमाननारे असल्याने पुणेकरांची मात्र या राजकारणात कोंडी होणार आहे असे दिसते आहे .
या सर्व पार्श्वभूमीवर आज अजितदादांच्या खरडपट्टीमुळे सोमवार पासून पाणीकपात रद्द करून नेहमीप्रमाणे पाणी पुरवठा होईल असे महापौर जाहीर करून मोकळे झाले आहेत तर आयुक्त मात्र ते शक्य नाही असे सांगून मोकळे झाले आहेत . नेमके पुणेकर आणि पुणे जिल्ह्यातील नागरिक शेतकरी यांच्या वाट्याला काय येणार आहे हे मात्र वरूणराजा ठरवणार आहे हे नक्की …