पुणे- शहर पोलीस दलाचे ट्विटर अकाऊंट सुरू करण्यात आले असून यावरूनही आता पोलिसांशी संपर्क साधता येईल किंवा शंका -प्रश्न नागरिक विचारू शकतील असे आज पोलिसांनी जाहीर केले पोलिसांची वेबसाईट पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली अद्ययावत करण्यात आली आहे. त्याचे नूतनीकरण बाबत औपचारीक उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले.मुंबईच्या संचिका पांडे यांनी वेबसाईट अद्ययावत करून दिली आहे
यावेळी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सह-पोलीस आयुक्त सुनील रामानंद, अप्पर पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, आर्थिक व सायबर गुन्हे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सर्व परिमंडळ पोलीस उपायुक्त, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त, यांच्यासह गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पुणे पोलिसांचे ट्विटर हँडल @PuneCityPolice असे ठेवण्यात आले आहे. यामध्ये नागरिकांनी विचारलेल्या ट्विट्सला (प्रश्न/समस्या) तात्काळ प्रतिसाद देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न त्वरित सोडविण्यासाठी मदत होईल. नागरिकांच्या सूचनांचा उपयोग करून पुणे शहरातील घडणारे गुन्हे, वाहतूक समस्या, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच सामाजिक सलोखा राखण्यास मदत होईल. तसेच पोलीस व जनता यांच्यात सुसंवाद वाढावा त्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
पुणे पोलीस वेबसाईटचा चेहरा मोहरा बदलला आहे. यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. त्यात सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस चौकी, यांचे फोन क्रमांक प्रेसनोट, मिसिंग व्यक्तींबाबतची माहिती, बेवारस मयताबाबतची माहिती, माहिती अधिकार, पाहिजे, फरारी आरोपी, सर्व प्रकारचे फॉर्मस, रिक्रुटमेंट, अॅट्रॉसिटी अॅक्ट केसेसची माहिती, सर्व शाखेची माहिती आहे.




