विषमतेची दरी पाहवत नाही-ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू
पुणे : दि. 27
समाजात जे काही चाललेले आहे ते बघवत नाही. विषमतेची दरी पाहवत नाही. मला खूप त्रास होतोय, कुणी उपाय सांगाल का? अशा शब्दात सामाजिक अस्वस्थतेवर यंदाचे महर्षी पुरस्कार प्राप्त व ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी सहवेदना व्यक्त केल्या.
पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे यंदाचा 21वा महर्षी पुरस्कार डॉ. श्रीराम लागू यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी डॉ. श्रीराम लागू यांनी आपल्या भावना मोजक्या शब्दात व्यक्त केल्या.
याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर, दीपा लागू, रजनी वेलणकर, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, दादा गुजर, वास्तुविशारद महेश नामपूरकर, डॉ. सतीश देसाई, आय.ए.एस. अधिकारी सुशील खोडवेकर, अभिनेत्री ज्योती सुभाष, सुलभा तेरणीकर, आयोजक व अध्यक्ष आबा बागुल, जयश्री बागुल, घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, अमित बागुल, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
महर्षी पुरस्कार प्राप्त केल्यानंतर डॉ. श्रीराम लागू म्हणाले, खरं म्हणजे मला स्वत:विषयी बोलणे जमत नाही. दुसर्यांनी लिहिलेले पाठ करून ते मी मांडू शकतो. एक नट म्हणून ते मला उत्तम जमते. सद्यस्थिती पाहता मी अक्षरश: गोठून गेलो आहे. आपण कुठल्या परिस्थितीत वावरतोय याचा विचार करतोय. एकीकडे आपण नाटक पाहतो, तर बाहेर भिक मागणारे हात असतात. हे सहन होत नाहीय. मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय. कुणी यावर उपाय सांगेल का? अशा शब्दात त्यांनी सामाजिक प्रश्नांवर सहवेदना व्यक्त केल्या. शिवाय एकीकडे चांगले कार्य असे बोलले जाते तर दुसरीकडे त्याला कोणी जागतही नाही. असेही ते म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘मन की बात सोडा, काम की बात करा’
अध्यक्षीय भाषणात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सध्या समाजात अस्वस्थता आहे, हे डॉ. श्रीराम लागू यांनी मांडलेल्या सहवेदना खरंच विचार करण्यासारखी परिस्थिती आहे. त्यांच्या चेहर्यावरुनच समाजाप्रती असणारी त्यांची आस्था जाणवत आहे. आम्हीही सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवितो आणि डॉ. लागू यांच्या सामना चित्रपटातील मारूती कांबळेचे पात्र आम्हाला आठवते. त्या मारूती कांबळेंचं काय झालं हे नंतर प्रेक्षकांना जरी कळलं असेल पण सध्याच्या राजकारणात मारूती कांबळेचं काय झालं? हे विरोधी पक्षनेता म्हणून आम्हाला सभागृहात विचारावं लागतं. मुख्यमंत्र्यांना वारंवार विचारूनही मारूती कांबळेेंचं काय झालं हा शब्दप्रयोग वारंवार करावा लागतो. आत्ताची परिस्थिती ‘मन की बात नको, काम की बात करो’ अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्ताधार्यांवर आसूड ओढला. ते म्हणाले, सिंहासन चित्रपटातून एकप्रकारे राजकारणाची सद्यस्थिती काय आहे हेच स्पष्ट होते.
सत्कार स्विकारल्यानंतर प्रदीप वेलणकर म्हणाले, माझ्या आयुष्यात दोनच पुरस्कार मला महत्त्वाचे आहेत, तेही डॉ. श्रीराम लागू यांच्या उपस्थितीत मिळाले आहेत. हे पुरस्कार माझ्या कायम स्मरणात राहतील. उशिरा का होईना मला पुरस्कार मिळाले, असे स्पष्ट करताना आयोजक आबा बागुल यांच्या समाजाप्रती असलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गारही त्यांनी काढले.
माजी आमदार उल्हास पवार म्हणाले, महर्षी पुरस्कारापलीकडील व्यक्तीमत्त्व डॉ. लागू यांचं आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिका अजरामर आहेत. महेश नामपूरकर म्हणाले, डॉ. श्रीराम लागू यांच्या अभिनयातून, कलेतून प्रेरणा मिळते. दर्जेदार भूमिका आणि त्यातील वेगळी छटा हा ध्यास कसा असतो हेच दर्शविते, असे स्पष्ट करून आबा बागुल यांना सामाजिक मूल्यांचा ध्यास आहे, असेही ते म्हणाले.
प्रास्तविकात आबा बागुल म्हणाले, डॉ. श्रीराम लागू यांच्या कार्याचे मोजमाप करू शकणार नाही, असे उत्तुंग व्यक्तीमत्त्व त्यांचे आहे. आज त्यांना महर्षी पुरस्काराने सन्मानित केल्याने खर्या अर्थाने सार्थक झाले आहे. वास्तविक महर्षीच्या पुढे त्यांची योग्यता आहे, असेही ते म्हणाले.
मानपत्राचे वाचन अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी केले. स्वागत घनश्याम सावंत यांनी तर सूत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केले.