पुणे-अॅट्रोसिटी कायद्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून पुकारण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. या बंदमध्ये काही लोकांचा बळी गेला असून त्याला सरकार आणि सुप्रीम कोर्ट जबाबदार आहे अशी टीका भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. सोशल मीडियावर आज भार बंद बाबतचा मेसेज व्हायरल झाला. त्या बंदला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. अॅट्रोसिटी कायद्याबाबत पुनर्विचार याचिका दाखल झालीच पाहिजे या मागणीत अयोग्य काय? असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच या सगळ्या प्रश्नांबाबत, दलितांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे येऊन बोलले पाहिजे अशीही मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देशातील सद्यस्थिती लक्षात घेतली तर देशाचा सीरिया व्हायला वेळ लागणार नाही. दहा दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आंदोलनाबाबत मेसेज फिरला. हा मेसेज कोणत्या संघटनेने फिरवला ते ठाऊक नाही. मात्र सोशल मीडियाची ताकद काय असते आणि दलित बांधव या ताकदीवर देशभरात एकत्र कसे येऊ शकतात हे सगळ्यांनी पाहिले असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणावरही त्यांनी भाष्य केले. या सगळ्या प्रकरणात सरकार संभाजी भिडेंना पाठिशी घालते आहे. मिलिंद एकबोटेंना अटक झाली तर मग संभाजी भिडेंना अद्याप अटक का करण्यात आली नाही असाही प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.