
डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हल’चे राज्यपालांच्या हस्ते शानदार उद्घाटन
‘ दकनी अदब फाऊंडेशन’ तर्फे पुण्यात आयोजित तीन दिवसीय ‘डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हल’ चे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते झाले. शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी सायंकाळी या फेस्टिव्हलचा उद्धाटन सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे झाला.यावेळी दिग्दर्शक विशाल भारद्वाज, माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह, साखर आयुक्त सौरभ राव,जिल्हाधिकारी नवल किशोर राम, दिग्दर्शक विशाल भारद्वाज, मोनिका सिंग,मनोज ठाकूर, रवींद्र तोमर उपस्थित होते. मोनिका सिंग यांनी प्रास्ताविक केले. मोनिका सिंग यांच्या गझलांच्या संग्रहाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते झाले.
‘ दकनी अदब फाऊंडेशन’ तर्फे पुण्यात 31 जानेवारी पासून तीन दिवसीय ‘डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हल’ चे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य,कविता, नाट्य, चर्चा अशा बहुरंगी,बहु आयामी कार्यक्रमांचे आयोजन या फेस्टीव्हल मध्ये केले आहे.फेस्टिव्हलचे हे दुसरे वर्ष आहे.
साहित्य -संस्कृतीचा मिलाफ होत राहावा : विशाल भारद्वाज
विशाल भारद्वाज म्हणाले, समाजात लिटरेचर फेस्टिव्हल होत आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. साहित्य, संस्कृती, कला यांचा चांगला मिलाफ या फेस्टिव्हलमध्ये राहिला आहे. या निमित्ताने जे मंथन होईल ते समाजाला पुढे घेऊन जाईल.
साहित्याने जोडण्याचे काम करावे : डॉ. सत्यपाल सिंह
सत्यपाल सिंह म्हणाले, वेद हे जगातले पहिले काव्य होते. काव्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. नव्या पिढीसमोर चांगले साहित्य येत नाही.जीवन समृध्द करण्यासाठी, सर्वांगीण विकास करण्यासाठी साहित्याची गरज आहे. सर्वांना जोडण्याचे काम साहित्याने करावे.
केवळ मतभेद नको, मंथनातून नवनीत यावे : राज्यपाल
राज्यपाल भगतसिंह कोशियारी म्हणाले, ‘ भारत रत्नांची खाण आहे. या महोत्सवाच्या आयोजन बद्दल मोनिका सिंग आणी सहकाऱ्यांचे अभिनंदन केले पाहिजे. पुणे ही सांस्कृतिक राजधानी असून येथे होत असलेला महोत्सव महत्वपूर्ण आहे.कलेला नवे स्वरूप येताना मूळे सुरक्षित राहिली पाहिजेत. साहित्यात समाजाचे प्रतिबिंब पडत असते.कलेत ताकद असते, त्याचा उपयोग कसा होतो, हे पाहणे महत्वाचे आहे. स्वतःला लिबरल, सिव्हील सोसायटी , पुरोगामी म्हणणारे अनेक आहेत. त्यांनी इतरांशी केवळ मतभेद न मांडता चर्चा केली पाहिजे. समाज युगानुयुगे टिकण्यासाठी, एक करण्यासाठी साहित्यिक, कलाकार योगदान देऊ शकतात. हे योगदान देश, जगासाठी उपयुक्त ठरू शकते. या विचारमंथनातून नवनीत पुढे येईल असा विश्वास वाटतो.
राजीव श्रीवास्तव यांनी सूत्रसंचालन केले.
31 जानेवारी ते 2 फेब्रवारीपर्यंत सायंकाळचे कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे आणि दिवसभर चे कार्यक्रम नेहरू सभागृह (घोले रस्ता) येथे या फेस्टीव्हलचे विविध कार्यक्रम होतील.
विशाल भारद्वाज, आरती अंकलीकर, सुबोध भावे,डॉ कुमार विश्वास, स्वानंद किरकिरे, अशोक नायगावकर, मुनव्वर राणा, दानिश हुसेन, निझामी ब्रदर्स, लुबना सलीम असे 25 हून अधिक कलाकार,साहित्यिक,गायक,पटकथा लेखक,कवी या फेस्टीव्हल मध्ये सहभागी होत आहेत.
फेस्टीव्हल सर्वांसाठी खुला असला तरी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी http://deccanliteraturefestival.org/ संकेत स्थळावर करावी लागणार आहे, अशी माहिती जयराम कुलकर्णी यांनी दिली.
पहिल्या दिवशी बालगंधर्व रंगमंदिर येथे ३१ जानेवारी रोजी उद्घाटन कार्यक्रमानंतर विशाल भारद्वाज यांच्या उपस्थितीत ‘व्यावसायिक चित्रपटातील कल्पकता’ या विषयावर परिसंवाद झाला.’विरासत’ या कार्यक्रमात आरती अंकलीकर यांच्या गायनाने पहिल्या दिवसातील कार्यक्रमांचा समारोप झाला.
दुसर्या दिवशी १ फेब्रुवारी रोजी स्वतंत्र ग्रुप च्या नाटकाने प्रारंभ होणार आहे.’समाजाची बदलती भाषा ‘ या विषयावर परिसंवाद होणार असून बॉलीवूड मधील पटकथा लेखक जावेद सिद्दिकी ,वेब सिरीज चे दिग्दर्शक श्रावण करात आदी सहभागी होणार आहेत.अभिनेते सुबोध भावे हे ‘प्रादेशिक सिनेमा आणि वाहिन्यांचा उदय ‘ या विषयावर बोलणार आहेत.त्यांनतर स्वानंद किरकिरे यांच्याशी चर्चेचा कार्यक्रम होणार आहे.’गीतकारी’ असे या कार्यक्रमाचे नाव असणार आहे.दानिश हुसेन हे उर्दू कथाकथन (दास्तान गोई) सादर करणार आहेत.’रंग ‘ या मुशायऱ्याने दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचा समारोप होईल .डॉ कुमार विश्वास,मुनव्वर राणा,स्वानंद किरकिरे यात सहभागी होतील .