पानिपत हा अजोड शौर्य -जिद्द आणि समर्पणाचा आविष्कार
डॉ. आनंद भालेराव यांचे प्रतिपादन
पुणे :’दिल्लीचे तख्त राखण्याची जबाबदारी असल्याने मराठे अब्दालीच्या बंदोबस्तासाठी उत्तरेत गेले , दक्षिण ,उत्तर आणि राजस्थानातील राजे मराठ्यांच्या मदतीला आले नाहीत तरीही पानिपतला मराठी सैन्याने शौर्याची पराकाष्ठा केली. पानिपत हा मराठी सैन्याच्या अजोड शौर्य -जिद्द आणि समर्पणाचा आविष्कार आहे,असे प्रतिपादन भारती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी केले .
भारती अभियांत्रिकी महाविद्यालय कला मंडळात झालेल्या ‘पानिपतची शौर्यगाथा ‘ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. हा कार्यक्रम शुक्रवारी सायकाळी झाला.
युद्धाची पार्श्वभूमी सांगताना डॉ भालेराव म्हणाले ,’शिव छत्रपती आणि पानिपत हे दोन्ही कालखंड मराठी माणसाच्या मनात रुतलेले कालखंड आहेत . बाजीराव पेशव्यांच्या काळात मराठी साम्राज्य अटकेपार गेले . लाहोर ,अटक,सिंधू नदी आणि पूर्वेकडे दिनापूर ,बंगाल,कटक पर्यंत मराठी फौजांचा संचार झाला . दिल्लीचे तख्त राखण्याची जबाबदारी मराठ्यांवर होती . परकीय आक्रमण असलेल्या अब्दालीला भारतात टिकू न देणे हे मराठी सैन्याने परम कर्तव्य मानले . पराक्रमाची शर्त करीत जिंकत आणलेले युद्ध मराठे हरले. परस्पर वर्चस्वाच्या स्पर्धेमुळे अविश्वास असणारे उत्तरेतील मराठे सरदार हे पराभवाचे एक कारण ठरले . अब्दालीला भरलेल्या नद्या पार करण्याचे तंत्र अवगत होते ,गनिमी काव्यात तो वरचढ होता . घनघोर युद्धात मातब्बर पडल्याने आणि काही निघून गेल्याने मराठे सैन्य हतबल झाले आणि पराभूत झाले . पानिपत चा रणसंग्राम जिंकला तरी अब्दालीने इतकी हाय खाल्ली कि दिल्ली ताब्यात ने घेता तो परत अफगाणिस्तान ला गेला आणि पुन्हा कधीही आक्रमण करून भारतात आला नाही . हे मराठी सैन्याचे यशच आहे .
शूरपणे लढणारा कोवळा विश्वासराव ,’बचेंगे तो औरभी लढेंगे ‘ म्हणणारे दत्ताजी ,बळवंतराव मेहेंदळे यांचा पराक्रम ,विश्वासराव भाऊ यांच्याशी एकनिष्ठ राहणारा इब्राहीम खान गारदी ,विश्वासराव जखमी झाल्यावर हताश होणारे सदाशिवरावभाऊ अशा असामींमुळे पानिपत अजरामर ठरले,असे डॉ भालेराव यांनी सांगितले.
परकियांच्या विरोधात ताकदीने उभे राहिलेल्या आणि तत्वासाठी लढलेल्या मराठ्यांच्या पानिपत लढाईचा इतिहास आपण शौर्याचा -पराक्रमाचा इतिहास म्हणून जपला पाहिजे .