‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’चे आयएमईडीमध्ये उद्घाटन
पुणे :
‘कोणताही नवीन अभ्यासक्रम आखताना कौशल्यबुद्धी, नाविन्य आणि संशोधनाची संधी त्यात असली पाहिजे’, असे प्रतिपादन भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.
‘भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी) येथे ‘दूरशिक्षण अभ्यासक्रमांसाठी अध्ययन सामग्रीचे लेखन‘ या विषयावरील ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ चे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी आयएमईडी एरंडवणे कॅम्पस येथे झालेल्या कार्यशाळेत डॉ. माणिकराव साळुंखे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
डॉ. साळुंखे म्हणाले, ‘दूरशिक्षण पद्धतीचे अभ्यासक्रम सुरू करणे सोपे आहे. मात्र, त्याच्यासाठी अध्ययन सामग्री तयार करणे अवघड असते. कोणताही नवीन अभ्यासक्रम सुरू करताना विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यवृद्धी होणे हे उद्दिष्ट असावे. विषयाची पूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देता येणे गरजेचे आहे. संबंधित अभ्यासविषयात नावीन्य असावे, संशोधनाच्या संधी असाव्यात.’
‘भारती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशन’चे संचालक डॉ. एस. बी. सावंत यांनी पारंपरिक पद्धतीने शिकताना विद्यार्थ्यांना येणार्या अडचणींची माहिती दिली.
डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले, ‘दूरशिक्षण अभ्यासक्रमासाठी कोर्स मटेरिअल तयार करताना त्या विषयाचा गुणवत्ता पूर्ण आशय आणता आला पाहिजे. प्रत्यक्ष लेखनापूर्वी त्याचा आराखडा तयार असणे आवश्यक आहे. डॉ. अंबुजा साळगावकर यांनी माहिती-तंत्रज्ञानाच्या उपयोगाबाबत मार्गदर्शन केले, तर डॉ. माधवी धारणकर यांनी प्रत्यक्ष लेखनाचा सराव करून घेतला.’
डॉ. सचिन वेर्णेकर (‘भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी) चे संचालक) यांनी स्वागत केले.