पुणे :
‘लायन्स क्लब ने समाजात सेवावृत्ती रुजविली आहे ,पुढील काळात युवा नेतृत्वघडणाची जबाबदारी लायन्स ने घ्यावी असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले . राजकारण हे अळवावरचे पाणी असते ,पान हलले कि पाण्याचे थेम्ब पटापट पडतात ,समाजकारणच चिरकाल टिकणारे असल्याने हा देश राजकारण्यांमुळे चालत नसून समाजकारण्यांमुळे चालतो ‘असे ही ते म्हणाले .
‘लायन्स क्लब पुणे औंध – पाषाण’ च्या अध्यक्षपदी डॉ. सतीश देसाई यांच्या आणि कार्यकारिणीतील सदस्यांच्या शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी सायंकाळी घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते . यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने गिरीश बापट बोलत होते .
लायन्सचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी अध्यक्षस्थानी होते . उपप्रांतपाल रमेश शाह ,मावळते अध्यक्ष डॉ प्रदीप दामले ,सचिव गणेश जाधव ,प्रदीप बर्गे ,गिरीश मालपाणी आदी व्यासपीठावर उपस्थित होते .
गिरीश बापट म्हणाले ,’माणसातील मनुष्यत्व उभे करून दुसऱ्याला मदत करण्याची भावना ,संस्कार निर्माण करणे हे लायन्स चे यश आहे . लायन्स चे हे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे . युवा पिढीला मार्गदर्शनाची गरज असून लायन्स या पिढीतील नेतृत्व गुण शोधून त्यांना पुढील काळाचे नेतृत्व करण्यासाठी घडवावे ‘
राजकारण हे अळवावरचे पाणी असते ,पान हलले कि पाण्याचे थेम्ब पटापट पडतात ,म्हणून हा देश राजकारण्यांमुळे चालत नसून समाजकारण्यांमुळे चालतो. समाजकारण हेच चिरकाल टिकते . राजकारणात निवडणुकीपूर्वी जोरात काम होते आणि निवडणुकीनंतर संपते . ‘
डॉ . सतीश देसाई या मित्रासाठी या पदग्रहण समारंभाला मी आलो .देसाई हे कल्पक नेतृत्व असून स्वतः काम करत करत दुसऱ्यांना कामाला लावण्याची कला त्यांच्याकडे आहे . असेही ते म्हणाले
लायन मदनभाई सुरा यांच्या स्मरणार्थ ‘लायनभूषण ‘ पुरस्कार सुरु केला जाणार असल्याची माहिती डॉ सतीश देसाई यांनी यावेळी दिली . लायन्स च्या नव्या शतकाची सुरुवात विविधअंगी समाजकार्याने केली जाणार आहे ,असेही त्यांनी सांगितले .
सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले .
दिलीप शेठ यांनी आभार मानले .
सभागृहात यावेळी विनोद शाह ,कृष्णकांत कुदळे ,अंकुश काकडे ,अरुण शेवते ,प्रकाश देवळे ,मिलिंद जोशी ,रवी चौधरी ,सुरेश धर्मावत ,सचिन इटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते .