पुणे :
निर्माल्य व्यवस्थापनासाठी पुण्यातील तीन ‘रोटरी क्लब’ने पुढाकार घेतला आहे. गणेशोत्सवात या तीन क्लबच्या पुढाकाराने आणि पालिकेच्या सहकार्याने निर्माल्य खत निर्मिती प्रकल्प प्रथमच पुण्यात सुरु होत आहे.
हा प्रकल्प दिनांक २७ ऑगस्ट पासून कार्यरत होणार आहे, रोटरी क्लबच्या वतीने ‘पुणे रोटरी वॉटर कमिटी’ प्रमुख व जलप्रेमी सतीश खाडे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
गणेशपूजा, आरतीसाठी सार्वजनिक मंडळे आणि घरांमध्ये शेकडो टन फुले, दुर्वा वापरल्या जातात. त्याचे विसर्जन गणेश मुर्ति विसर्जनावेळी केले जाते. पालिकेतर्फे या निर्माल्याचे नदीत विसर्जन होऊन ती प्रदुषित होऊ नये , म्हणून जागोजागी घाटांवर , पुलांवर निर्माल्य कलश उभारले जातात. मात्र, या निर्माल्यातून खत निर्मिती करुन पालिका हद्दीतील बागांमध्ये वापरण्याचा प्रकल्प रोटरीच्या पुढाकाराने पुण्यात प्रथमच सुरू होत आहे.
या प्रकल्पात निर्मात्याचे श्रेडर द्वारे बारीक तुकडे करुन कंपोस्ट खत केले जाणार आहे. रोटरीने देणगीतून मिळवलेल्या या श्रेडरला पु.ल. देशपांडे उद्यानात पालिका जागा देणार आहे. प्रतिदिन २ टन क्षमता असलेला हा श्रेडर गणेशोत्सव काळात अखंड कार्यरत राहील.
यासाठी ‘रोटरी क्लब ऑफ सिंहगड रोड’, ’रोटरी क्लब ऑफ युवा’, ’रोटरी क्लब ऑफ एनआयबीएम’ या ३ रोटरी क्लबनी पुढाकार घेतला आहे. यासाठी नुकतीच पालिकेत घन कचरा व्यवस्थापन विभाग चे उपायुक्त सुरेश जगताप व महापौर मुक्ता टिळक या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक होऊन या प्रकल्पाला संमती देण्यात आली,असे सतीश खाडे यांनी सांगितले.
दिनांक २७ तारखेपासून कार्यान्वित होणाऱ्या या प्रकल्पाचा नदी स्वच्छ राखण्यासाठी उपयोग होणार आहे.
—————————– –