पालकमंत्री गिरीश बापट यांचा पाठपुरावा
पुणे : महापालिकेच्या कचरा डेपोसाठी जागा देणाऱ्या उरळी देवाची आणि फुरसुंगी येथील प्रकल्पग्रस्तांच्या वारसास महानगरपालिकेत कायम स्वरूपी नोकरी देण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडून याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
उरळी देवाची आणि फुरसुंगी येथील शेतकऱ्यांच्या जागा महानगरपालिकेने कचरा डेपोसाठी ताब्यात घेतली आहे. मात्र कचरा डेपो मुळे गावात अनेक समस्या निर्माण झाला असल्याचे सांगत २००९ पासून फुरसुंगी आणि उरळी या दोन्ही गावांमधील ग्रामस्थांनी आंदोलन करत कचरा टाकण्यास तीव्र विरोध दर्शवत आंदोलन केले होते. त्यावेळी ग्रामस्थांकडून या डेपोसाठी जागा देणाऱ्यांच्या मुलांना महानगरपालिकेत कायम स्वरूपी सेवेत घेण्याची मागणी केली होती. शासन स्तरावर हि प्रक्रिया सुरु असल्याने या गावातील ६२ मुलांना २०११ पासून बिगारी म्हणून सहा महिन्यांसाठी पालिकेच्या सेवेत घेतले. त्यानंतर प्रकल्प ग्रस्तांच्या मुलांना पालिकेत कायमस्वरूपी सेवेत घेण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. मात्र तो निर्णय शासनाकडे प्रलंबित होता.
त्यानंतर पुन्हा या मागणीसाठी या गावातील प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन सुरु केले होते. त्यात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना सेवेत कायम करण्याबाबतचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाठपुरावा करत याबाबतचा फेर प्रस्ताव महापालिकेला राज्य शासनाकडे पाठवण्यास सांगितला होता. महापालीकेकडून आलेल्या फेर प्रस्तावावर आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा होवून या गावातील ५७ मुलांना नोकरीत कायम करण्याच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.