प्रदूषणाची सुरवात घरापासुन होते: माधवराव गाडगीळ
पुणे : ‘घरातील किटक, डास, झुरळे यांचा नाश करण्याच्या नादात जी रासायनिक फवारणी, कॉईल जाळण्याचे प्रकार घरात चालतात त्यामुळे कर्करोग, फुफ्फुसाचे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या फवारणीमुळे प्रदूषणाला सुरुवात होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसत आहे, असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.
निमित्त्त होते ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’ तर्फे आयोजित ‘ग्रीन सॊसायटी’ स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचे.
‘ग्रीन सॊसायटी’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण डॉ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते झाले. ‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’ स्पर्धेचे प्रायोजक होते.
यावेळी रोटरीचे माजी प्रांतपाल विनय कुलकर्णी , ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’चे अध्यक्ष गणेश जाधव, ‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’ चे राजेंद्र आवटे, रोटेरियन गिरीश मठकर आणि विश्वास लेले उपस्थित होते.
डॉ. माधव गाडगीळ म्हणाले, ‘समाजात होणाऱ्या विविध प्रकारच्या प्रदूषणाबाबत अनेकदा चर्चा होते. परंतु त्याची सुरुवात आपण घरातूनच करत असतो. घरामध्ये विविध प्रकारचे फवारे वापरणे, कीटकनाशके यामुळे आपण नकळत हवा आणि पाण्याचे प्रदूषण करत असतो. प्रदूषण नियंत्रणाची सुरुवात प्रथम घरापासून व्हायला हवी. ऊर्जा, आणि पाणीबचत काळाची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून रोटरी क्लब गांधीभवनचा ‘ग्रीन सॊसायटी स्पर्धा’ हा उपक्रम स्तुत्य आणि समाजोपयोगी ठरेल.’
ग्रीन सॊसायटी स्पर्धा व्यक्तिगत सदनिका, बंगला, एक इमारत सोसायटी तसेच मोठ्या गृहसंकुलांसाठी खुली होती. पुण्यातील एकूण ४५ सोसायटयांनी सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेत सौर ऊर्जा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कचरा निर्मूलन, पाणी बचत, वृक्षारोपण, बायोगॅस या निकषांद्वारे मूल्यमापन करण्यात आले, असे स्पर्धेचे निमंत्रक विश्वास लेले यांनी सांगितले.
राजेंद्र आवटे म्हणाले, ‘शहरीकरणामुळे नैसर्गिक संपदेवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. म्हणून प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. याकरिता अशा प्रकारच्या स्पर्धेची गरज भासत आहे. ‘
‘पुणे पालिका, ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन’, ‘सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज्’, ‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’, ‘पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ’, ‘सस्टेनेबल लिव्हिंग इंटिग्रेटेड सोल्युशन्स’, या संस्थांनी एकत्रितपणे या स्पर्धेचे आयोजन केले होते’, अशी माहिती प्रास्ताविकात गणेश जाधव यांनी दिली. आभार गिरीश मठकर यांनी मानले.
स्पर्धेचे परीक्षण पर्यावरण क्षेत्रातील विविध विभागातील तज्ज्ञ अनघा पुरोहित, मनीषा कोष्टी, धनश्री कुलकर्णी, अमरनाथ चक्रदेव आणि निरंजन उपासनी यांनी केले.
*स्पर्धेचा निकाल :*
१. एक सदनिका / घर यामध्ये प्रमोद तांबे (‘स्नेह सेवा’, सदाशिव पेठ) यांना ,
२. वैयक्तिक बंगला / रो हाऊस : प्रथम क्रमांक मयूर भावे (‘वूडलॅंड्स ड्रीम’, कोथरूड), व्दितीय क्रमांक : जितेंद्र गानला (कोथरूड) यांना,
३. एक इमारत सोसायटी या मध्ये स्टर्लिंग हॅबिटॅट, बावधन
४. गृह संकुल : प्रथम क्रमांक : युथिका, बाणेर, व्दितीय क्रमांक : रोहन सेहेर, बाणेर) आणि तृतीय क्रमांक रहेजा वूड्स, कल्याणीनगर
जूरी विशेष पुरस्कार : कुमार सबलाईम, कोंढवा आणि न्याती एन्विरोन्स, विश्रांतवाडी यांनी पटकाविले.