मराठी भाषेचा अधिकाधिक वापर दररोजच्या जीवनात व्हावा : डॉ. वसंत देशपांडे
पुणे :
‘मराठी भाषेचा अधिकाधिक वापर दररोजच्या जीवनात व्हावा यासाठी मराठी तंत्रज्ञान उपयोगी पडते,’ असे मत डॉ. वसंत सी. देशपांडे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिक्षण विभाग, माजी अधिष्ठाता) यांनी मांडले.
मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘मराठी संभाषण अकादमी’ वतीने आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम’ प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. हा कार्यक्रम आज मंगळवारी डॉ. ए आर शेख असेम्ब्ली हॉल सकाळी झाला.
दिनांक १ ते १५ जानेवारी २०१८ दरम्यान झालेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना प्रमुख पाहुणे डॉ. वसंत सी. देशपांडे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
कार्यक्रमाचे संयोजन ‘मराठी संभाषण अकादमी’ च्या प्रमुख नूरजहाँ शेख यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अमिता डंबीर यांनी केला. शेहनाझ शेख यांनी आभार मानले.
याप्रसंगी एम. सी. ई. सोसायटीचे सचिव लतीफ मगदूम, प्रा. शैला बूटवाला (आबेदा इनामदार सिनियर कॉलेज), शिक्षिका तेजस्वनी पवार, शहनाझ शेख, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. वसंत सी. देशपांडे यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या कार्याची माहिती दिली.
या कार्यक्रमादरम्यान ‘स्वरचक्र ऍप’ डाउनलोड करून विद्यार्थ्यांना थेट प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या ऍप द्वारे मराठी भाषा लिहिता व शिकता येते. उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्री विनोद तावडे यांना या ऍप द्वारे शुभेच्छा देण्यात आल्या.