पुणे ः
‘देशातील सद्यस्थिती’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन ‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने शनिवारी करण्यात आले होते. अर्थशास्त्राचे अभ्यासक आणि सी. ए. अजित जोशी आणि सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठापूरवाला यांनी उद्घाटनाच्या सत्रात मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात सुनील तांबे, श्रृती तांबे यांनी मार्गदर्शन केले.
शहराध्यक्ष खासदार अॅड. वंदना चव्हाण अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुखपाहुणे म्हणून दत्ता बाळसराफ उपस्थित होते. प्रास्ताविक अंकुश काकडे यांनी केले. अशोक राठी यांनी सूत्रसंचालन केले.
हॉटेल ‘तरवडे क्लर्क इन’ येथे झालेल्या या एकदिवसीय कार्यशाळेला पदाधिकारी, सेल अध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुपाली चाकणकर, चेतन तुपे हेही व्यासपीठावर उपस्थित होते.
‘भाजपच्या सत्ता काळात देशाचे मनुवादीकरण होत आहे, धर्मनिरपेक्ष पक्षांनी आणि महाराष्ट्राने याचा प्रतिवाद केला पाहिजे.’ असे प्रतिपादन फिरोज मिठापूरवाला यांनी केले. ते म्हणाले, ‘हिंदू धर्मातील सुधारणावादी चळवळीप्रमाणे मुस्लीम धर्मातील सुधारणावादी चळवळीलाही सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा.
अजित जोशी म्हणाले, ‘नोटबंदी आणि जीएसटी हे विषय घिसाडघाईने राबविले गेल्याने झालेले दुष्परिणाम समोर येत असून, त्यावर जनजागृती करणे आवश्यक आहे. अर्थकारणाशी संबंधित विषय सर्वांच्याच जीवनावर परिणाम करत असल्याने राजकीय पक्षांनी त्याकडे गांभीर्याने पाहायला हवे आहे.’
दत्ता बाळसराफ म्हणाले, ’देशातील वास्तव परिस्थिती समजून घेऊन सत्य हे समाजापर्यंत पोहोचवले पाहिजे.’
सुनील तांबे म्हणाले,‘ देशाच्या भौगोलिक रचनेनुसार परंपरा जोपासल्या गेल्या पाहिजेत. हा देश सर्वसमावेश बनला आहे परंतु ; आज मोदी सरकारच्या काळात एकाच धर्माचा अजेंडा राबविल्यासारखे सरकार काम करीत आहे. त्यामुळे मूळ सर्व समावेशक परंपरेला तडा जात आहे.’
श्रुती तांबे महिला अत्याचार या विषयी भाष्य करताना म्हणाल्या, ‘महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन, महिलांचे समाजातील स्थान बदलेले पाहिजे. महिला अत्याचाराविरोधी आवाज उठवणे आवश्यक आहे, याकरीता गणेश मंडळ, युवकांनी समाजसेवा करणे आवश्यक आहे. अत्याचारग्रस्त स्त्रीला आरोपीच्या पिंजर्यात उभे करू नये. महिला अत्याचार थांबविण्यासाठी जनजागृतीची गरज आहे.’
प्रत्येक महिन्याच्या दुसर्या व चौथ्या शनिवारी चालू घडामोडींवर आधारित कार्यकर्ता संवाद परिषद या चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार असल्याचे शिबिराच्या समारोप प्रसंगी अशोक राठी यांनी सांगितले. या संवाद परिषदेमध्ये चालू घडामोडींवर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या 2019 सालापर्यंत वैचारीक, बौद्धिक आणि चांगले वक्तृत्व असणारी कार्यकर्त्यांची टीम तयार होऊ शकणार आहे. अॅड. वंदना चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.