‘नदी अंतःकरणात वाहू द्या, जलसुधारणांसाठी लोकचळवळ आवश्यक’ – श्रावण हर्डीकर
पुणे :
‘नागरीकरण, औद्योगिकीकरणामुळे नद्या अस्वच्छ झाल्या आहेत, त्या स्वच्छ, जीवित, सुंदर करण्यासाठी नदी अंतःकरणात वाहू द्या, पिंपरी-चिंचवड परिसरातील नद्यांमध्ये सांडपाणी जाऊ देणार नाही, यासाठीचे प्रकल्प पूर्ण होत आले आहेत, मात्र नदी सुधारणांसाठी लोकचळवळ आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.
डॉ.राजेंद्रसिंह यांच्या प्रेरणेतून आणि वित्त, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जलबिरादरी आयोजित ‘नमामि चंद्रभागा जलसाक्षरता यात्रा’चे स्वागत पिंपरी-चिंचवडमध्ये करण्यात आले. ‘ऑटोक्लास्टर’ सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हर्डीकर बोलत होते.
ते म्हणाले, ‘पाणी शुद्ध करूनच नद्यांमध्ये सोडायचे हा पिंपरी पालिकेचा निर्धार आहे. त्यासाठी मलःनिसारण प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यात काही अडचणी आहेत. मात्र, बोपखेलसाठी स्वतंत्र प्रकल्प झाला की पिंपरी पालिका ही सांडपाण्यावर 100 टक्के प्रक्रिया करणारी पहिली पालिका ठरेल. त्यासाठी जैविक तंत्रज्ञान वापरण्याचीही पालिकेची तयारी आहे.’
‘नदी ही अंतःकरणातून वाहिली पाहिजे, नदीशी सर्वांनी जोडून घेतले पाहिजे. नदी सुधारणांसाठी लोकचळवळ आवश्यक आहे,’ असेही ते म्हणाले.
जलबिरादारीचे संघटक सुनील जोशी म्हणाले, ‘नदी ही आई आहे, तिच्याशी असलेल्या बांधिलकीचे प्रतिक म्हणून नदी-खोरे नकाशा सरकारी कार्यालयात लावला पाहिजे.’
यावेळी ‘नमामि चंद्रभागा’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. जलप्रतिज्ञा घेण्यात आली. पथनाट्य सादर करण्यात आले. ‘सेरी’ संस्थेच्या सायली जोशी यांनी उदयपूरमधील नदी कशी जीवीत करण्यात आली याचे विवेचन केले.
सीमा सावळे, एकनाथ पवार, किरण कलमदानी, नामदेव डाके, तुषार हिंगे, प्रमोद कुटे, भैय्या लांडगे, प्रवीण लडकत, पर्यावरण विभागप्रमुख संजय कुलकर्णी, यात्राप्रमुख नरेंद्र चुघ, संघटक सुनील जोशी, धनंजय शेडबाळे उपस्थित होते.
सायंकाळी मोरया गोसावी मंदिर घाट, चिखली घाट येथे नदीपूजन, आरती करण्यात आली. महापौर नितीन काळजे, विलास मेडिगेरी, राजाभाऊ गोलांडे इत्यादी उपस्थित होते. ‘सायकल मित्र’, ‘सावरकर मंडळ’, ‘पवना जलमैत्री अभियान’, ‘भावसार व्हीजन’, ‘सेव्ह इंद्रायणी’ इत्यादी संस्था सहभागी झाल्या.
पालिकेत महापौर कक्षात कार्यकर्त्यांनी महापौरांची भेट घेतली. यावेळी एकनाथ पवार, भैय्या लांडगे उपस्थित होते. पालिका हद्दीतील नद्या स्वच्छ करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ‘चिखली नाला शुद्धीकरणाचा कृती आराखडा करू’ असेही ते म्हणाले.