अभिनेत्री पुर्वी भावे नवीन डान्स सीरिज घेऊन आली आहे. ह्या अंतर्नाद सीरिजमधले पहिले ‘भज गणपती’ हे भरतानाट्यम नृत्यशैलीतले गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. ह्या अल्बमचे वैशिष्ठ्य म्हणजे ‘भज गणपती’ गाण्याला पुर्वी भावेच्या आई सुप्रसिध्द शास्त्रीय गायिका वर्षा भावे ह्यांनी संगीत दिले आहे.
अभिनेत्री आणि नृत्यांगना पुर्वी भावे म्हणते, “कोणत्याही शुभकार्याची सुरूवात आपण गणेश आरधनेने आणि वंदनेने करतो. त्यामुळे सीरिजची सुरूवात ‘भज गणपती’ ह्या गणेशवंदनेने झाली आहे. लहानपणापासून मी भरतनाट्यम शिकत आलीय. त्यामूळे सीरिज सुरू करताना पहिले गाणे भरतनाट्यम शैलीचे असावे असे मला वाटले. आणि त्यापध्दतीचे गाणे आईने कंपोज केले. आता ह्यापूढील गाण्यामधून तुम्हांला वेगवेगळ्या नृत्यशैली पाहायला मिळतील.”
‘भज गणपती’ गाणे सिन्नरमधल्या गुंदेश्वर मंदिरात चित्रीत झाले आहे. ह्या गाण्याच्या चित्रीकरणाचा अनुभव सांगताना पुर्वी म्हणते, “आम्ही ह्या गाण्याचे चित्रीकरण मे महिन्यात केले. तेव्हा ह्या मंदिराच्या परिसरातली जमीन एवढी तापायची की, अनवाणी चालणेही कठीण व्हायचे. तसेच ती जमीनही ओबडधोबड होती. त्यामुळे डान्स करणे कठीण जात होते. पण आम्हांला खुप कमी वेळाची परवानगी होती. त्यामुळे हे आव्हानही स्विकारावं लागलं. वेळेच्या अभावामूळे अनेक शॉट वेनटेक चित्रीत झालेत. पण आता ह्या आव्हानात्मक गाण्याच्या चित्रीकरणाचा रिझल्ट चांगला आहे. आणि आता युट्यूबवरून गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने मेहनतीचे चीज झाल्यासारखे वाटतेय. ”