मुंबई:. ‘शरद पवारांनी केलेलं काँग्रेसचं वर्णन अतिशय योग्य आहे’, असे विधान करत राष्ट्रवादीआणि काँग्रेसच्या वादात आता भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या सध्याच्या अवस्थेबाबत आपली भूमिका व्यक्त केली. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले. आज देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तसेच, शरद पवार यांनी काँग्रेसवर व्यक्तं केलेलं मत योग्य असल्याचं म्हटलं. ‘मला वाटतं की, शरद पवारांनी केलेलं काँग्रेसचं यापेक्षा करेक्ट वर्णन दुसरं असूच शकत नाही. सध्या काँग्रेस आपल्या जुन्या पुण्याईवर जगतोय. मालगुजारी तर गेली, आता उरलेल्या मालावर गुजरान चालली आहे. शरद पवारांनी केलेलं वर्णन चपखल लागू होणारं आहे’, अशी टीका फडणवीसांनी काँग्रेसवर केली.