मुंबई दि.२७ जुलै – राज्याचं विधिमंडळ, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते हे देखील याच लोकशाही व्यवस्थेचे अविभाज्य भाग आहेत आणि तेही घटनात्मक मार्गानेच त्या पदावर आहेत, याचं विस्मरण होऊ देऊ नका, असा खोचक टोला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राऊतांना लगावला.
शिवसेनंच मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मध्ये विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या कोकण दौऱ्यावर “पर्यटन दौरा” म्हणून टीका करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले की, ज्यावेळी कोकणातील भीषण पूरपरिस्थितीबाबत मला माहिती मिळाली तेव्हा मुंबईत थांबणे मला प्रशस्थ वाटले नाही. त्यामुळे तातडीने मी सहकाऱ्यांसह कोकणाकडे धाव घेतली. फक्त याच वेळी नाही तर निसर्गसारख्या संकटात देखील त्याच रात्री मी कोकण गाठलं होतं. आपत्तीत धावून जाणं, मदत करणं, मदतीसाठी प्रयत्न करणं, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.
आज सामनात पर्यटन म्हणून केलेल्या टीकेला उत्तर देताना दरेकर म्हणाले की, “महाराष्ट्रात एक सरकार आहे. मुख्यमंत्री आहेच आहे व ही व्यवस्था लोकशाही तसेच घटनात्मक मार्गाने सत्तेवर आली आहे”, हे कुणीच नाकबूल करणार नाही. पण याचही विस्मरण होऊ देता कामा नये की, राज्याचं विधीमंडळ, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते हे देखील याच लोकशाही व्यवस्थेचे अविभाज्य भाग आहेत आणि तेही धटनात्मक मार्गानेच त्या पदावर आहेत. घटनास्थळी जाऊन लोकांना धीर देणं, सरकार आणि विरोधी पक्ष एकत्रितपणे या संकटाशी मुकाबला करीत आहेत. हा विश्वास निर्माण करणं, प्रशासकीय यंत्रणेकडून होणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेणं आणि त्रुटी सरकारच्या निदर्शनास आणून देणं, हे विरोधी पक्ष नेते पदाच्या कर्तव्याचा एक भाग आहे, त्याला पर्यटन संबोधून लोकशाहीची थट्टा करणे योग्य नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया दरेकर यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे.