पुणे -शहरातील बससेवेच्या मुद्यावरुन लोकप्रतिनीधी आणि पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्यातील वादावर शुक्रवारी रात्री पडदा पडला. पीएमपीएमएलच्या कार्यालयातून सुरु झालेला वाद अखेर त्याच कार्यालयांत संपुष्टात आला. शालेय विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या बस सेवेतील दरवाढीच्या निर्णयानंतर मुंढे यांनी महापौर आणि लोकप्रतिनिधी यांना डावलून एककल्ली कारभार चालविल्याचा आरोप होत होता , दरवाढ मागे घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यापर्यंत धाव घेतली. हे प्रकरण सुरु असतानाच भाडेतत्वावरील बस चालकांनी संप पुकारला. एकाच वेळी मुंढेवर दोन मोठी संकट निर्माण झाली. पण मुंढेनी आपल्या मुद्यावर ठाम राहत दोन्ही मुद्यावरअखेर विजय मिळविला
पीएमपीएमएलच्या दुहेरी समस्यावर चर्चा करण्यासाठी पीएमपीएमएलच्या कार्यालयात मुंढे यांच्यासह पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि लोकप्रतिनीधी यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाली. यात मुंढेनी बाजी मारली. डबघाईला आलेल्या पीएमपीएमएलचा कारभार सुधारण्यासाठी दरवाढीचा घेतलेला निर्णय कायम ठेवण्यात ते यशस्वी ठरले. शालेय बसच्या दरात प्रति कि.मी. ६१ रूपये प्रति किमी वरून १४१ रुपये प्रति किमी रुपये इतकी वाढ करण्यात आली होती. हा दर आता ६६ रुपये प्रती किमी करण्यात आला असून पीएमपीएमएलला १४१ रुपयेच्या बदल्यात होणारी घट पालिका प्रशासनाकडून दिली जाणार आहे. एवढेच नाही तर ठेकेदारांच्या बसेसचा संपही मागे घेण्यात आलाय.
या बैठकीनंतर महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की, पुणे शहरातील ठेकेदारांच्या बसेस उद्या पासून रस्त्यावर येतील. त्यांच्यावर जी दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्याची शहनिशा करून कार्यवाही केली जाईल. बससेवेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ७५ टक्केंपेक्षा अधिक सवलत मिळणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शालेय बससाठी ६६ रुपये प्रति किमी दर आकारण्यात येणार आहे. या दरामुळे पीएमपीएमएलने ठरवलेल्या दरात निर्माण होणारी घट पालिका देणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी मुंढे म्हणाले की, शनिवारपासून सर्व बस नागरिकांच्या सेवेत दाखल होतील. बस थांब्यावर बसेस थांबत नसल्याने प्रशासनाने केलेली दंडाची कारवाई आणि तक्रारी तपासण्यात येतील. ते पुढे म्हणाले की, कंपन्यांनी बससेवा सुधारली पाहिजे. तसेच, थांब्यांवर बसेस थांबविणे, बसेस मार्गावर नेताना लॉगिंन करणे, स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. शालेय बस दरवाढ आणि ठेकेदारांनी केलेला संप यावर तब्बल तीन तास चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे,महापौर मुक्ता टिळक यांच्यासह उपमहापौर सिध्दार्थ धेडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले तसेच ठेकेदारही उपस्थित होते.