पुणे – कोथरूडमधील नियोजित शिवसृष्टी जैववैविध्य उद्यानाच्या (बीडीपी) जागेत साकारण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरु असून , पुणे महापालिकेच्या खास सभेत महिन्यापूर्वी नगरसेवक महेश नानासाहेब वाबळे यांनी पर्याय म्हणून शेजारील जागेचा उल्लेख करून याबाबतची हिंट दिली होती . आता या परिस्थितीत शिवसृष्टीसाठी च्या जागेच्या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार माजी उपमहापौर दीपक मानकर यांची भूमिका बदलेल काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे . दरम्यान शिवसृष्टी आणि मेट्रो या दोहोंच्या अशा जागावाद प्रकरणामागे मोठे राजकारण शिजत असल्याचा संशय निर्माण झाला आहे .
पुणे आणि नागपूरमधील मेट्रो प्रकल्पाच्या कामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी मुंबईत नुकताच घेतला. या वेळी मुख्मंत्र्यांनी या बाबत राजकीय सहमती घडवून शिवसृष्टी उभारणार असल्याचे सांगितले. तसेच या बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशीही चर्चा करण्यात येईल, असे सांगितल्याचे वृत्त आहे .दरम्यान कोथरूडमध्ये शिवसृष्टी उभारावी आणि मेट्रो स्थानक भूमिगत ठेवावे, अशी भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी पक्ष आणि दीपक मानकर यांची भूमिका आता बदलेल काय ? याकडे लक्ष लागून आहे
वनाज- रामवाडी मार्गाचे काम सुरू झाले आहे. तसेच या मार्गावर स्थानके उभारण्याचीही निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे आगामी काळात कचरा डेपोच्या पूर्वीच्या जागेवर मेट्रो स्थानक उभारले जाऊ शकते. या जागेशेजारी ‘बीडीपी’ची वनविभागाची जागा आहे. बीडीपीच्या जागेत संग्रहालयाला परवानगी असल्याचे राज्य सरकारने या पूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे त्या जमिनीवर शिवसृष्टी उभारता येईल, असा भाजपच्या प्रमुख नेते मंडळींनी सूर धरला आहे. मात्र राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी बोलताना यापूर्वी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी भूमिगत मेट्रोला विरोध नसल्याचे स्पष्ट केले होते . तरीही शिवसृष्टी साठी येथे अन्य जागा सुचविली जाते आहे . यामागे काही राजकारण शिजत असल्याचा अनेकांना संशय आहे .