पुणे -महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत योगेश मुळीक यांची निवड करण्यात आली आहे. मुळीक यांना 10 मते मिळाली तर यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवार लक्ष्मी दुधाणे यांना 5 मते पडली. शिवसेनेच्या संगीता ठोसर गैरहजर राहिल्या. स्थायी समितीमध्ये भाजपचे बहुमत असल्याने आजची निवडणूक ही केवळ औपचारिकता होती.
यावेळी सभागृहात महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, मावळते स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, विरोधीपक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, पीठासन अधिकारी शेखर गायकवाड उपस्थित होते. या समितीमध्ये 16 पैकी 10 सदस्य भाजपाचे आहेत. पंधरा दिवसांपूर्वी चिठ्ठीद्वारे आठ सदस्य बाहेर पडले. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी योगेश मुळीक यांची निवड झाल्याने वडगाव शेरी मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांची ताकद वाढली आहे. या वाढलेल्या ताकदीचा उपयोग त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.ज्याला भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी हि दुजोरा दिला आहे .
आज मुळीक यांची निवड झाल्यानंतर गोगावले यांनी पत्रकारांशी बोलताना जी विधाने केली त्यांचा आधार घेऊन धोक्यात असलेल्या विधान सभा मतदार संघाकडे पक्षाने लक्ष वळविले असल्याचे मानले जात आहे . खडकवासला , हडपसर आणि वडगावशेरी ला ताकद देण्याचे संकेत आज गोगावले यांनी पालिकेत केलेल्या विधानांमधून मिळते आहे .
वडगाव शेरी मतदारसंघात कॉंग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने वर्चस्व राखले होते. 2014 पर्यंत येथे भाजप मर्यादित असा पक्ष होता. भाजपसाठी कठीण असलेल्या काळापासून मुळीक कुटुंबाने भाजपचे कमळ हाती घेतले होते. त्यात 2012 मध्ये पहिल्यांदा भाजपचे नगरसेवक म्हणून योगेश मुळीक महापालिकेवर निवडून गेले होते. कमळाच्या चिन्हावर मिळालेला हा पहिलाच विजय या भागात होता. त्यानंतर 2014 मध्ये मोदी लाटेत निष्ठेचा फायदा झाला. त्यात जगदीश मुळीक हे आमदार झाले. वडगाव शेरी हा मतदारसंख्येच्या दृष्टीने सर्वांत मोठा मतदारसंघ आहे. परप्रांतीयांची मतेही येथे लक्षणीय आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होण्यासाठी येथे भाजपची ताकद वाढणे गरजेचे असल्याने मुळीकांना ताकद देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे मानण्यात येते आहे .
दरम्यान आज महापालिकेत स्थायी समिती ची निवडणूक प्रत्यक्षात पहा कशी झाली , निवडणुकीनंतर पत्रकारांशी बोलताना कोण काय म्हणाले ? आणि निवडणुकीनंतर झालेला विजयाचा जल्लोष .. सोबत येथे खास व्हिडिओ..पहा