पुणे- महापालिकेच्या जागा , विविध क्रीडा संकुले, टेंडर ,नगरसेवक आणि त्यांची नातेवाईक घेत असल्याचा आरोप आता सर्रास होतो आहे , परवा तर मुख्य सभेत एका नगरसेविकेने आपल्या नातेवाईकाला पे अँड पार्क चा ठेका मिळावा असे चक्क उघडपणे भाषणात सांगितले … या सर्व पार्श्वभूमीवर आता काल सायंकाळी महापालिकेच्या मुख्य भवनात , बांधकाम विभागातील एक अभियंता ऐकत नाहीच हे पाहून, तो बसलेला असलेल्या, खुर्चीवर लाथ मारून , एका नगरसेविकेच्या पतीने त्याला दमदाटी केल्याच्या घटनेचे आज थेट मुख्य सभेत पडसाद उमटले .
एकीकडे बोगस कर्मचाऱ्याच्या सूत्रधाराला पाठीशी घालायचे आणि दुसरीकडे मुख्य भवनात येताना जाताना सामान्य नागरिकांना अडविणे , त्यांची चौकशी करणे असे प्रकार सुरु आहेत , मुख्य भवनातील असे दमदाटीचे प्रकार उघड होऊ नये म्हणून सीसी टीव्ही यंत्रणा हि निष्प्रभ ठरविली जाते आहे .
आज पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे आणि भैयासाहेब जाधव यांनी गुंडाच्या वेशभूषेत प्रवेश करीतच ‘ सुंदर यादव’ प्रवृत्तीचा निषेध केला . ठेकेदारांना धमकाविणे ,अधिकाऱ्यांना धमकाविणे असे प्रकार चालू असल्याचा आरोप या वेळी राष्ट्रवादीने केला .. अशा ‘सुंदर यादव’ प्रवृत्ती पासून अधिकाऱ्यांचे संरक्षण करणार कोण ? असा सवाल यावेळी राष्ट्रवादी कडून करण्यात आला .