पुणे -महापालिका आयुक्तांच्या पत्रानंतर पुन्हा एकदा कागदपत्रांची पडताळणी करून निवडणूक आयोगाने अखेर रेश्मा भोसले यांचा भाजपकडून भरलेला उमेदवारी अर्ज व एबी फॉर्म वैध ठरवण्यात आला. त्यामुळे रेश्मा भोसले यांना प्रभाग क्रमांक 7 ड मधून भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे.
घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी रेश्मा भोसले यांना भाजपची उमेदवारी मंजूर करण्यास नाकारले होते. त्यावर महापालिका आयुक्तांनी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मिळावे, असे पत्र पाठवले होते.
त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाचे सचिव यांनी या संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करून रेश्मा भोसले यांना भाजपची उमेदवारी देण्यात यावी, असा निर्णय घेतला. व तसे पत्र पालिका आयुक्तांना आज पाठविले. त्यानुसार भोसले यांना भाजपचे कमळ हे चिन्ह देऊन आज दुपारी सर्वात शेवटी प्रभाग क्रं 7 ड च्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. पुण्यात सर्वात शेवटी प्रसिद्ध झालेली ही उमेदवारांची यादी आहे.
महापालिका आयुक्तांकडून मिळालेल्या पत्रानुसार निर्णय घेऊन भोसले यांना भाजपचे चिन्ह देण्यात आले आहे.