पुणे-मतदानानंतर सुरू झालेल्या चर्चा, मतदान्नोतर सर्वेक्षण यामुळे संपूर्ण शहरात राजकीय चर्चाना उधाण आले असून महापालिकेत सत्ता कोणाची, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. महापालिकेत भाजप परिवर्तन घडविणार की सत्तेच्या चाव्या पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती जाणार हे गुरुवारी (२३ फेब्रुवारी) स्पष्ट होणार आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास कोणते पर्याय स्वीकारावे लागतील, याची चाचपणीही राजकीय पक्षांकडून सुरू झाली आहे.
महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी ८२ जागांचा टप्पा पार करावा लागणार आहे. निवडणुकीपूर्वी काही काळ भाजपला सत्तेसाठीचे अनुकूल वातावरण होते. मात्र त्यानंतर आयात उमेदवारांवर दाखविण्यात आलेली भिस्त, उमेदवारी यादीतील घोळ, पक्षात झालेले प्रवेश, त्यांना देण्यात आलेली उमेदवारी यामुळे काहीप्रमाणात भाजपला प्रतिकूल वातावरण तयार झाल्याचेही दिसून आले. निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेची पंचवीस वर्षांपूर्वीची युती तुटली. तर सत्ता मिळविण्यासाठी आणि प्रतिकूल वातावरण लक्षात घेऊन शेवटच्या क्षणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची काही जागांवर आघाडी झाली. त्यामुळे भाजपला सत्ता मिळणार का, आघाडीचा दोन्ही काँग्रेसला फायदा होणार का, याबाबत सध्या चर्चा आहे.