पुणे :
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग’ (प्रभाग क्र. 35) च्या वतीने ‘दुर्मिळ विमानांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला सुमारे दहा हजार नागरिकांनी भेट दिली. प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या हस्ते करण्यात आले. अशी माहिती यावेळी प्रदर्शनाचे आयोजक चैतन्य उर्फ सनी मानकर (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग पुणे शहर अध्यक्ष) यांनी दिली.
प्रेक्षणीय आणि वाचनीय असे हे प्रदर्शन डॉ. श्यामा प्रसाद उद्यानासमोर, पटवर्धन बाग, एरंडवणा पुणे येथे शनिवार 30 व रविवार 31 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन प्रसंगी अंकूश काकडे, दीपक मानकर, लक्ष्मीकांत खाबिया आदी मान्यवर उपस्थित होते.
‘प्रदर्शनाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. बालचमूंनी प्रदर्शनाचा भरघोस आनंद लुटला. बाँबर प्लेन, रबर पॉवर्ड, स्टॅक प्ले, क्वाडकॉप्टर, जेट, रिमोट कंट्रोल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या देशी आणि विदेशी बनावटीच्या विमानाची प्रतिकृती या प्रदर्शनाचे आकर्षण ठरली. या दुर्मिळ विमानांच्या प्रदर्शनात दोन फुटांपासून सात फुटांपर्यंतच्या आकाराच्या प्रतिकृती, राइट बंधूंनी बनविलेल्या पहिल्या विमानाची प्रतिकृती आणि वेगवेगळ्या प्रवासी कंपन्यांच्या लहान आकारातील विमान प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. मुलांना विमान तंत्रज्ञान, त्यांचे प्रकार आणि या क्षेत्रातील करिअरच्या संधींची माहिती देणे हा या प्रदर्शनाचा उद्देश होता.’ असे प्रदर्शनाचे आयोजक चैतन्य उर्फ सनी मानकर (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग पुणे शहर अध्यक्ष) यांनी सांगितले.
‘भित्तिपत्रकांतून विमानाचे सुटे भाग, त्यांचा इतिहास, वर्षानुवर्षे त्यात होत असलेली प्रगती, मानवरहित विमानांची माहिती, विमान उडण्यामागील विज्ञानाची माहिती नागरिकांना देण्यात आली.’ असेही चैतन्य उर्फ सनी मानकर यांनी सांगितले.


