- भारतीच्या घरी आणि ऑफिसमध्ये सापडला 86.5 ग्राम गांजा, पती हर्षसोबत गांजा घेतल्याची दिली कबुली.
- भारतीच्या अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा येथील तिन्ही घरांवर रेड टाकण्यात आली.
मुंबई- प्रसिद्ध विनोदी कलाकार भारती सिंहला नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB)आज अटक केली. चौकशी दरम्यान भारती आणि तिचा नवरा हर्ष यांनी गांजा घेण्याची कबुली दिली आहे. . भारतीचे घर आणि प्रॉडक्शन हाऊसवर NCB ने शनिवारी सकाळी छापेमारी केली. दोन्ही ठिकाणाहून NCB च्या अधिकाऱ्यांनी 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
एका अमली पदार्थ तस्कराच्या चौकशीत या दोघांची नावे समोर आली होती. त्यानंतर भारतीच्या अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा येथील तिन्ही घरांवर रेड टाकण्यात आली. विशेष म्हणजे, या धाडीत NCB च्या टीमने अमली पदार्थ जप्त देखील केले आहे.
भारती आणि हर्षला ताब्यात घेऊन चौकशी
NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितले, की टीमने भारती आणि हर्ष दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. या दोघांच्या घरी कंझम्पशन क्वांटिटी अर्थात वापरण्यासाठी आणलेल्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, एका ड्रग पेडलरने या दोघांच्या घरी गांजा असल्याची माहिती दिली होती. त्यावरूनच भारतीच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला आहे.