पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिनांक 25 ते 30 डिसेंबर 2016 दरम्यान ‘बंडगार्डन आर्ट प्लाझा फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे.
संगीतापासून विविध कलांचे सादरीकरण ,ऐतिहासिक पुण्याची माहिती ,नामवंतांशी संवाद अशी सांस्कृतिक मेजवानी असणाऱ्या या ‘बंडगार्डन आर्ट प्लाझा फेस्ट’चे उदघाटन रविवार २५ डिसेंबर २०१६ रोजी सायंकाळी साडे सहा वाजता ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते , महापौर प्रशांत जगताप , हायटेक टेक्सटाईल पार्क(बारामती)च्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे , अशी माहिती शहराध्यक्ष, खासदार अॅड.वंदना चव्हाण यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
या फेस्ट विषयी अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या,25 ते 30 डिसेंबर दरम्यान रोज सायंकाळी ४ ते ८ या वेळेत आर्ट फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्ट मध्ये संगीत,कला,सांस्कृतिक आणि मनोरंजनपर कार्यक्रम होणार आहेत. पुण्याची संस्कृती, पुण्यासंदर्भात आकर्षक माहितीचा आनंद लुटता येणार आहे. खुले आहे.
यामध्ये ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर कार्टून काढणार आहेत.’चिंटू’ या गाजलेल्या चित्र मालिकेचे जनक चारुहास पंडित,ड्रम्स,अकॉर्डीयन, व्हॉयोलीन, गिटार वादन, वॉटर कलर पेंटिंग-राहुल चक्रवर्ती, तबला- पखवाज जुगलबंदी, सुफी संगीत ,स्टीपलिंग आर्ट- दीपाली पतवडकर,सितार व बासरी वादन, यांचा सहभाग असणार आहे.
अभिजित धोंडफळे शिल्पकला सादर करणार आहेत तर मनीषा कुलकर्णी पेपर आर्टचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत, या ‘बंडगार्डन आर्ट प्लाझा फेस्ट’ मधून पुणेकरांना कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.
‘बंड गार्डन ‘च्या ऐतिहासिक पुलाच्या कलात्मक नूतनीकरणासाठी ,आर्ट प्लाझा निर्मितीसाठी एड . वंदना चव्हाण यांनी खासदार निधीतून ५० लाख दिले आहेत . या पुलाला हेरिटेज दर्जा आहे .
पुणे हे ऐतिहासिक शहर, सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्याबरोबरच आय टी-ऑटो हब व युवकांचे शहर म्हणून म्हणूनही पुणे नावारूपाला आले आहे. शहरवासीयांना तसेच इतर राज्यातून आपल्या शहराला भेट देणाऱ्यांना येथील ऐतिहासिक वास्तूंचा इतिहास व त्याची भव्यता,वास्तुकला बघायला , ऐकायला मिळावे यासाठी महानगरपालिकेने विशेष प्रयत्न केले आहेत व त्या वास्तू नागरिकांना खुल्या केल्या आहेत.
पुण्यातील या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक वास्तू म्हणजे ‘‘बंडगार्डन आर्ट प्लाझा’ मुळा मुठेच्या संगमानंतर नदीवर असलेल्या ऐतिहासिक पुलावर कलाकारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून या आर्ट प्लाझाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी तयार केलेल्या विविध सुविधांची माहिती पुणेकरांना व्हावी व या वास्तूचा आनंद लुटता यावा यासाठी‘बंडगार्डन आर्ट प्लाझा फेस्ट’चे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे असेही अॅड.वंदना चव्हाण यांनी सांगितले.
या सांस्कृतिक सोहळयाला पुणेकरांनी आपल्या परिवार व मित्रमंडळींसमवेत सहभागी व्हावे ,असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले .

