पुणे :
‘थॅलेसेमिया’ या रक्ताच्या दुर्मिळ विकारावरील उपचाराच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा सदस्य, आणि पुणे शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांना तातडीने औषध पुरवठ्याची समस्या सोडविण्याची मागणी पत्र लिहून केली आहे.
या विकाराने 1 लाख पीडित रुग्ण देशात आहेत. यावरील उपचारासाठी लागणारे ‘डिसफेरल’ हे औषध रुग्णांना अपुरे पडत आहे. त्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. या औषधाचा पुरवठा करणार्या ‘नोवार्टिस’ कंपनीकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे औषधनिर्मितीचा पुरेसा स्टॉक असल्याचे सांगण्यात आले. तरीही बाजारपेठेत या औषधाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आल्याची शक्यता आहे.’ असे खा.वंदना चव्हाण यांनी जे.पी.नड्डा यांना लिहिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
अनेक शहरातील रुग्णांचे संघटन असलेल्या ‘थॅलेसेमिया सोसायट्या’कडे या औषधाचा साठा संपत आला आहे. लाखो रुग्णांच्या जीविताचा प्रश्न असल्याने या जीवरक्षक औषध पुरवठ्याप्रश्नी तातडीने लक्ष देउन औषध पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी खा. चव्हाण यांनी केली आहे.


