पुणे : सर्वच क्षेत्रात महिला यशाचे शिखरे काबीज करीत आहेत. आत्मविश्वासाने वाटचाल करीत आहेत. मात्र महिला सुरक्षेच्या किंवा कामाच्या ठिकाणी असलेल्या विविध प्रश्नांवर मात करण्यासाठी महिलांची स्वयंसिद्धता व एकजूट आवश्यक आहे, असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. ज्योती राजेशिर्के यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त बुधवारी (दि. 8) महावितरण व महापारेषणच्या वतीने रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रास्तापेठ येथील महावितरण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. राजेशिर्के बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महापारेषणचे मुख्य अभियंता श्री. रोहिदास मस्के होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, कार्यकारी अभियंता सौ. ज्योती चिमटे, सौ. पुनम रोकडे, सौ. प्रतिभा पवार उपस्थित होते.
कार्यक्रमात सौ. राजेशिर्के यांनी महिला सुरक्षितता व सावधगिरी याबाबत मार्गदर्शन केले तर प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करून वीजक्षेत्रासह विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी महावितरण व महापारेषणमधील महिला अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून 22 महिला स्वच्छता कर्मचार्यांना टिफीन बॉक्स तर कर्वेरोड येथील महिला सेवा मंडळाला विविध वस्तुंची भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मृदुला शिवदे व सौ. प्रतिभा निकाळजे यांनी केले. कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे, अनिल कोळप आदींसह महिला अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर व सहकार्यांनी पुढाकार घेतला.