पुणे, दि. 17 : वीजबिलांचा तपशील तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी व इतर माहिती वीजग्राहकांच्या मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे पाठविण्याची प्रक्रिया महावितरणकडून सुरु झाली आहे. यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील आतापर्यंत 36 लाख 14 हजार 806 वीजग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्यात आली आहे.
पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषीपंपधारक व इतर असे एकूण 68 लाख 63 हजार वीजग्राहक आहेत. त्यापैकी 36 लाख 14 हजार 806 वीजग्राहकांनी ग्राहक क्रमांकासोबत स्वतःचे मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड केलेले आहे. मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांच्या मोबाईलवर मासिक वीजबिलाची माहिती ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येत आहे. तसेच तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी वीजग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येत आहे. महावितरणने कर्मचार्यांसाठी तयार केलेल्या ‘कर्मचारी मित्र’ या मोबाईल अॅपद्वारे वीजपुरवठा बंद असलेल्या वीजवाहिनीची नोंद घेऊन संबंधीत वीजग्राहकांच्या मोबाईलवर वीजपुरवठा बंदबाबतचा कालावधी ‘एसएमएस’द्वारे नियमित कळविण्यात येत आहे.
महावितरणकडून पश्चिम महाराष्ट्रातील 100 टक्के वीजग्राहकांचे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची मोहीम सद्यस्थितीत सुरु आहे. याशिवाय वीजग्राहकांनाही स्वतःहून मोबाईल क्रमांकाची नोंदणी करता येणार आहे. यात वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून एसएमएस केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होणार आहे. याशिवाय 24(7 सुरु असणार्या कॉल सेंटरचे 1912 किंवा 18002003435 आणि 18002333435 हे तीन टोल फ्री क्रमांक उपलब्ध असून कोणत्याही कंपनीच्या मोबाईल किंवा दूरध्वनीद्वारे या दोन्ही क्रमांकावर संपर्क साधता येतो. तसेच महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अॅपवर मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.
सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात 14 लाख 31 हजार, कोल्हापूर- 7 लाख 1 हजार, सोलापूर- 5 लाख 52 हजार, सांगली- 5 लाख 16 हजार तर सातारा जिल्ह्यातील 4 लाख 14 हजार वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली आहे. उर्वरित 32 लाख 48 हजार 580 वीजग्राहकांनी ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची नोंदणी करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
चौकट –
वीजबिल भरणा केंद्गात
नोंदणी आता अनिवार्य – महावितरणने सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती केली असून त्याद्वारे वीजबिल भरणा केंद्गात ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्यात येत आहे. ग्राहकांना स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी झालेली नसल्यास बिल भरताना मोबाईल क्रमांक सांगणे अनिवार्य आहे. वीजग्राहकांनी स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.


