मुंबई,- वीजचोरी प्रकरणी पीठ गिरणी मालकास एक वर्ष सक्तमजुरी तसेच 1 लाख 42 हजार रुपये दंडाची शिक्षा नुकतीच यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील विशेष न्यायालयाने सुनावली आहे.
उमरखेड तालुक्यातील बेलखेड येथे शिवाजी पाटील यांची पिठाची गिरणी आहे. या ठिकाणी महावितरणचे कनिष्ठ अभियंता श्री. संजय राठोड तपासणीसाठी गेले असता त्यांना तेथील मीटरचे सिल तुटलेले आढळले व वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पिठगिरणी मालक पाटील यांनी एकूण रु. 47 हजार 410 रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले. वीजचोरी व दंडाची रक्कम भरण्यास पाटील यांनी नकार दिल्याने त्यांच्या विरोधात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी पुसद येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधिश श्री. एस.जे. शर्मा यांनी शिवाजी पाटील यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला आरोप सिध्द झाल्यामुळे त्यांना एक वर्ष सक्तमजुरी व 1 लाख 42 हजार रुपयांचा दंड व तो दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त शिक्षा असा निर्णय दि. 20 जुलै 2016 रोजी दिला आहे.

