पुणे, दि. 05 : महापारेषणच्या मनोऱ्याच्या (टॉवर लाईन) वीजवाहिन्यांची उंची वाढविण्याच्या पूर्वनियोजित व पूर्वसूचित कामामुळे 220 केव्ही क्षमतेच्या दोन वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा गुरुवारी (दि. 5) सकाळी 7 वाजता बंद ठेवण्यात आला. त्यामुळे पर्वती, पद्मावती, रास्तापेठ, कोथरूड विभागामधील विविध भागात वीजपुरवठा बंद होता. मात्र दुपारी दीड ते 4 वाजे दरम्यान या सर्व विभागांतील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला.
याबाबत माहिती अशी, की देहूरोड कात्रज बायपास राष्ट्रीय महामार्गावरील 220 केव्ही मनाेऱ्याच्या (टॉवर लाईन) 220 केव्ही वीजवाहिन्यांची उंची (ग्राऊंड क्लिअरंस) वाढविण्याचे पूर्वनियोजित काम महापारेषण कंपनीकडून पूर्वकल्पना देऊन गुरुवारी (दि. 5) सकाळी 7 वाजता सुरु करण्यात आले. या कामासाठी 220 केव्ही पर्वती – नांदेड सिटी व 220 केव्ही पर्वती – फुरसुंगी या दोन वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे महापारेषणच्या 220 केव्ही व 132 केव्ही पर्वती उपकेंद्र, जीआयएस 132 केव्ही तसेच महावितरणच्या विविध 22 केव्ही उपकेंद्रांचाही वीजपुरवठा बंद झाला. यात रास्तापेठ, कसबा पेठ, घोरपडी, मंडई, भवानी पेठ, मुकुंदनगर, शंकरसेठ रोड, महर्षीनगर, सॅलीसबरी पार्क तसेच वडगाव बुद्गुक, हिंगणे, विकास नगर, सिंहगड रोड, गुलटेकडी, सहकारनगर, मित्रमंडळ चौक, सुभाषनगर, पर्वती गाव, विठ्ठलवाडी, दत्तवाडी, शारदा मठ, अरण्येश्वर, पेशवे पार्क, नर्हे, नांदेड फाटा, आंबेगाव पठार, धनकवडी, आंबेगाव, नवी पेठ परिसर, पौड रोड, कोथरूड, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, चव्हाणनगर, बालाजीनगर, संभाजीनगर, राऊत बाग, कोंढवा, कात्रज आदी परिसरातील वीजपुरवठा सकाळी 7 ते दुपारपर्यंत देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी बंद होता.
महापारेषणचे मुख्य अभियंता श्री. रोहिदास मस्के यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी यांच्यासह सुमारे 70 अभियंते व कर्मचारी मनोर्याच्या वीजवाहिन्यांची उंची वाढविण्याच्या कामात सहभागी झाले होते. सुमारे 6 मीटर उंचीवर असलेल्या या दोन्ही 220 केव्ही वीजवाहिन्या सुमारे 12 मीटर उंचीवर नेण्याचे काम करण्यात आले. त्यासाठी जवळच एक स्वतंत्र मनोरा उभारण्यात आला व त्याद्वारे सर्वप्रथम 220 केव्ही पर्वती -फुरसुंगी वाहिनीचे काम दुपारी सव्वा वाजता पूर्ण करण्यात आले. या वीजवाहिनीवरच 220 केव्ही पर्वती – नांदेड सिटी वाहिनाचा वीजभार देण्यात आला. आणि 220 केव्ही पर्वती -फुरसुंगी या एकाच वाहिनीवरून 220 केव्ही व 132 केव्ही पर्वती उपकेंद्ग, जीआयएस 132 केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यानंतर महावितरणच्या सर्व उपकेंद्रांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरु झाला आणि पर्वती, पद्मावती, रास्तापेठ व कोथरूड विभागामधील सर्व परिसरातील वीजपुरवठा दुपारी चारपर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला.

