पुणे : घरघरांत किंवा कार्यालयांत वापरली जाणारी अत्याधुनिक उपकरणे, उद्योगांमधील स्वयंचलित यंत्रणा आदींमुळे वीज प्रणालीत निर्माण झालेले प्रदुषण किंवा अडथळे (हार्मोनिक्स) रोखण्याची गरज व उपाययोजनांबाबत महावितरणच्या वतीने नुकतेच एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
सेनापती बापट मार्गावरील प्रकाशभवनात महावितरणच्या चाचणी व गुणवत्ता नियंत्रण मंडल व एशिया पॉवर क्वॉलिटी इनिशिएटिव्ह (एपीक्यूआय) यांच्या संयुक्त सहकार्याने ‘क्वालीटी पॉवर व हार्मोनिक्स’ या विषयावर कार्यशाळा उत्साहात झाली. या कार्यशाळेत देशातील नामवंत वीजतज्ञ व महावितरणचे अभियंते, ग्राहक प्रतिनिधी सहभागी झाले होते.
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे, डॉ. व्ही. आर. कानेटकर, श्री. मानस कुंडू, श्री. थिरूमुर्ती, श्री. डी. व्ही. कुलकर्णी, श्री. पी. श्रीधरन, श्री. मोहम्मद मोहतसीब, अधीक्षक अभियंता श्री. रमेश मलामे आदींनी विद्युत प्रणालीमध्ये हार्मोनिक्स निर्माण होण्याची कारणे व त्यावरील उपाययोजना आदींबाबत सादरीकरणाद्वारे प्रबोधन केले. सोबतच वीज प्रणालीमध्ये येणारे हार्मोनिक्स रोखणार्या उपकरणांच्या डिझाईनची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली. वीजग्राहकांना हार्मोनिक्स माहिती देणे व जनजागृती करणे महत्वाचे आहे तसेच वीजग्राहक वापरत असलेल्या अत्याधुनिक उपकरणे किंवा स्वयंचलित यंत्रणेतून वीज प्रणालीमध्ये निर्माण होणारे प्रदुषण (हार्मोनिक्स) रोखणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले व त्यावरील उपाययोजनांबाबत या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.
कार्यशाळेत महावितरणचे मुख्य अभियंता श्री. अरूण रणखांबे (गुणवत्ता नियंत्रण), अधीक्षक अभियंता सर्वश्री सुंदर लटपटे, महेंद्ग दिवाकर, सुनील पावडे, अरुण थोरात, कार्यकारी अभियंता सर्वश्री दत्तात्रय बनसोडे, प्रविण नाईक, सुरेश वानखेडे आदींसह महावितरणच्या राज्यभरातील चाचणी विभागाचे अभियंते, ग्राहक प्रतिनिधी सहभागी झाले होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक सहाय्यक अभियंता श्री. भरत कदम यांनी केले. तर सूत्रसंचालन अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. संजय पाटील व सहाय्यक अभियंता सौ. अनिता चैाधरी यांनी केले.