मुंबई: राज्यातील थकबाकीदार कृषीपंपधारक शेतकऱ्यांच्या थकबाकी वसुलीसाठी जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री कृषीसंजीवनी योजना 2017 मध्ये सहभागी होण्यासाठी 15 नोव्हेंबर 2017 पर्यन्त मुदतवाढ देण्यात आली असून योजनेत सहभागी न होणाऱ्या कृषीग्राहकांकडून नियमाप्रमाणे थकबाकी वसुली करण्यात येईल. तसेच अनधिकृत जोडणीद्वारे वीजवापर करणाऱ्यांविरुध्द धडक मोहिम राबविण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
‘मुख्यमंत्री कृषीसंजीवनी योजना 2017′ साठी राज्यातील सर्व कृषिपंपधारक व उपसा जलसिंचन योजनेचे ग्राहक या योजनेसाठी पात्र आहेत. जून 2017 चे त्रैमासिक वीज देयके दि. 15 नोव्हेंबर 2017 पूर्वी भरून संबंधिताना या योजनेत सहभागी होता येईल. विद्युत पुरवठा चालू असलेल्या कृषीग्राहकांचा वीजपुरवठा 15 नोव्हेंबर 2017 पर्यन्त महावितरण खंडित करणार नाही. मात्र अशा कृषीग्राहकांनी या योजनेत भाग न घेतल्यास 15 नोव्हेंबर 2017 नंतर त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल.
31 मार्च 2017 अखेरीस असलेली वीजबिलाची मूळ थकबाकी रक्कम हप्त्यात भरण्याची मूभा ग्राहकांना राहणार आहे. ग्राहकांची मूळ थकबाकी 30 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास ती 10 समान हप्त्यांमध्ये प्रत्येक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये भरणा करणे आवश्यक राहील तर मूळ थकबाकी 30 हजारापेक्षा कमी असल्यास ती 5 समान हप्त्यांमध्ये प्रत्येक 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये भरणा करणे आवश्यक राहील. ज्या प्रमाणात 5 समान हप्ते कृषीग्राहक वेळेवर भरतील त्याचप्रमाणात कृषिपंपग्राहकांचे व्याज व दंडनियक आकार माफ करण्याबाबत शासनातर्फे विचार करण्यात येईल.
5 किंवा 10 हप्त्यांचा भरणा योजनेच्या कालावधीमध्ये निर्धारित मुदतीप्रमाणे भरणा करणे आवश्यक राहील. तसेच या योजनेत सहभागी होण्यासाठी मार्च 2017 अखेरची मूळ थकबाकी दि. 31 डिसेंबर 2018 पूर्वी दिलेल्या मुदतीत चालू देयकासहीत भरणे बंधनकारक राहील. योजनेत सहभागी झालेल्या कृषिग्राहकांना 1 एप्रिल 2017 नंतरची चालू वीजबिले पूर्णपणे भरणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी स्थानिकस्तरावर महावितरणतर्फे प्रत्येक आठवड्यात शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत.