पुणे व पिंपरी चिंचवड शहरासाठी प्रस्ताव – मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांची माहिती
पुणे, दि. 21 : मुसळधार पाऊस किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होण्यासाठी प्रामुख्याने 22 केव्ही फिडर पिलर कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरात सर्व 22 केव्ही फिडर पिलरच्या ठिकाणी आता अद्ययावत तंत्रज्ञानाचे 22 केव्ही रिंग मेन युनिट बसविण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनी दिली.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची प्रमुख तांत्रिक कारणे शोधण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून महावितरणकडून कार्यवाही सुरु आहे. या दोन्ही शहरात असलेल्या 22 केव्हीच्या फिडर पिलरमधील तांत्रिक दोषांमुळेच प्रामुख्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुसळधार पावसामुळे फिडर पिलरमध्ये पाणी शिरणे किंवा आर्द्गता (मॉईश्चर) निर्माण होणे, दरवाजे चोरून नेल्याने सुरक्षा धोक्यात येणे व इतर त्रुटींमुळे तांत्रिक बिघाड वाढण्याचे प्रकार दिसून आले आहे. या कारणांमुळेही कोंढवा, वानवडी, फातिमानगर, साळुंखे विहार, एनआयबीएम रोड परिसरात वीजपुरवठा रविवारी (दि. 20) विस्कळीत झाला होता.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरात असलेल्या 22 केव्ही फिडर पिलरच्या ठिकाणी 22 केव्ही रिंग मेन युनिट बसविण्याच्या प्रस्तावाची माहिती सोमवारी (दि. 21) मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनी मुख्यालयास दिली. वीजयंत्रणा सक्षमीकरणाच्या (सिस्टीम इंप्रुव्हमेंट) कार्यक्रमातून रिंग मेन युनिट बसविण्याचा प्रस्तावाला मुख्यालयाने सकारात्मक प्रतिसाद देत डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) पाठविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार दोन्ही शहरात 22 केव्ही फिडर पिलरच्या ठिकाणी रिंग मेन युनिट बसविण्याचा प्रस्ताव व डीपीआर तयार करण्यासाठी मंगळवारी (दि. 22) बैठक होणार आहे. सर्व माहिती संकलीत करून रिंग मेन युनिट बसविण्याचा प्रस्ताव व डीपीआर येत्या आठ दिवसांत मुख्यालयास पाठविण्यात येणार आहे. फिडर पिलरमध्ये निर्माण होणारे बहुतांश तांत्रिक दोष हे रिंग मेन युनिट बसविल्यानंतर टाळता येणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटीमध्ये समावेश असलेल्या पुणे व पिंपरी चिंचवडला अधिक दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा मिळणार आहे. हा प्रस्ताव मंजुर व आर्थिक निधी उपलब्ध झाल्यानंतर पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व 22 केव्ही फिडर पिलर बदलून त्या ठिकाणी रिंग मेन युनिट बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात येणार आहे.