पुणे : सेवाक्षेत्रात असणाऱ्या महावितरणचे प्रतिनिधी म्हणून काम करताना वीजग्राहकांना ग्राहकसेवा देण्यासाठी नेहमी तत्पर व सकारात्मक राहावे, असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी शनिवारी (दि. 6) जनमित्रांशी संवाद साधताना केले.
महावितरणच्या इतर परिमंडलातून बदली होऊन आलेल्या 114 जनमित्रांना पुणे परिमंडलात नियुक्तीचे आदेश देण्यात आले. यावेळी रास्तापेठ येथे आयोजित कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी जनमित्रांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, श्री. राजेंद्ग पवार, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. धैर्यशील गायकवाड, कार्यकारी अभियंता श्री. नरेंद्ग ताडे आदींची उपस्थिती होती.
मुख्य अभियंता श्री. मुंडे म्हणाले, जनमित्र हे महावितरणचे आधारस्तंभ आहेत. जनमित्रांनी वीजग्राहकांशी नेहमी सौजन्यशील व सहकार्याच्या भावनेतून संवाद ठेवावा. यातून महावितरणसह कर्मचारी म्हणून स्वतःचीही चांगली प्रतिमा निर्माण होते. ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे. वीजग्राहक व कंपनीहितासाठी अधिकाधिक प्रयत्न करतानाच थकबाकीसह वीजबिलांची वसुलीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, श्री. राजेंद्ग पवार व सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. गायकवाड यांनीही मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.

