मुंबई : महाराष्ट्र सरकार व मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे ‘राष्ट्रीय एकता दिवस’निमित्त आयोजित केलेल्या ‘रन फॉर युनिटी’ कार्यक्रमात भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची उपस्थिती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. पुण्यातील खासदार काकडे यांची मुंबईतील कार्यक्रमामध्ये थेट मुख्यमंत्र्यांसोबत स्टेजवरील उपस्थिती लक्षवेधी ठरली. मुख्यमंत्री फडणवीस यांनीच खासदार काकडे यांना मान दिल्याने त्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
या कार्यक्रमाला राज्यपाल सी विद्यासागर राव, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि इतर मान्यवरांचीही उपस्थिती होती. खासदार काकडे यांचे कार्यक्षेत्र पुणे असताना मुंबईत झालेल्या रन फॉर युनिटीच्या कार्यक्रमात स्टेजवर प्रमुख मान्यवरांच्या रांगेत बसण्याचा सन्मान मिळाला तो खरे तर, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळेच. कार्यक्रमाला 25 हजार विद्यार्थी व नागरिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. यावेळी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.
महापालिका निवडणुकीत पुण्यात भाजपाची एकहाती सत्ता आणण्यात खासदार संजय काकडे यांनी निर्णायक व मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे खासदार काकडे यांचे आधीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर असलेले विश्वासाचे बंध आणखी घट्ट झाले. त्यानंतर खासदार काकडे यांनी त्यांच्या वाढदिवसादिवशी पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील भाजपाचा आमदार नसलेल्या 40 विधानसभा मतदार संघाची 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली या मतदार संघात भाजपाचे कमळ फुलविण्याचा चंग खासदार काकडे यांनी बांधला आहे.
भाजपाची ताकद वाढविण्याबरोबरच 2019 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत खासदार काकडे यांनी आमदारांची संख्या वाढवून भाजपाची महाराष्ट्रातही एकहाती सत्ता येण्यासाठी नियोजन चालविले आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा झेंडा रोवायचा तर, तशाच खमक्या नेत्याची गरज भाजपाला होती. पुणे महापालिका निवडणुकीत खासदार काकडे यांनी त्यांच्या राजकीय कसबाची झलक दाखविली. आणि गरजसअसलेला खमक्या नेता खासदार काकडे यांच्या रुपाने भाजपाला मिळाला. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात भाजपाचा यापूर्वी कधीही आमदार नसलेल्या मतदार संघात काम करण्याचे धाडस खासदार काकडे यांनी दाखविले आहे.
खासदार काकडे यांच्या या कामांमुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासातील व्यक्ती म्हणून त्यांची ओळख बनत गेली. त्यामुळेच आजच्या मुंबईतील कार्यक्रमात कुठलाही संबंध नसताना खासदार काकडे यांना स्टेजवर मानाचे स्थान देत मुख्यमंत्री फडणवीस यांनीही खासदार काकडे यांचे महत्व अधोरेखीतच केल्याचे दिसते.