पुण्याच्या मोनिका शेख ठरल्या ‘आर्चर्झ मिसेस इंडिया २०१७’च्या सेकंड रनर-अप
पुणे – मुंबई येथे नुकत्याच झालेल्या ‘आर्चर्झ मिसेस इंडिया २०१७’ या स्पर्धेत पुण्याच्या मोनिका शेख या सेंकड रनर-अप ठरल्या आहेत. देशभरातील मुंबई, दिल्ली, कोलकाता, नागपूर तसेच पंजाब येथून सुमारे ३८ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. अमित तलवार, फिटनेस एक्सपर्ट लीना मोगरे, अभिनेता हितेन तेजवानी, सामाजिक कार्यकर्त्या बबिता वर्मा, अभिनेत्री रश्मी घोष आणि ज्योत्स्ना चांदोलास यांच्या पॅनलने स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले होते. तर करिष्मा कोटक आणि करण वाही यांनी स्पर्धेचे सूत्रसंचलन केले.
मोनिका शेख यांना स्पर्धेतील मिसेस ग्लॅमरस म्हणूनही निवडण्यात आले. यावेळी मोनिका अतिशय उत्साहीत झाल्या होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, “मिसेस इंडीया होण्याचे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. सेंकड रनर-अप पदाचा मान मिळताना पाहून मला अतिशय आनंद होत आहे.”
मोनिका शेख या बॅगलेस स्कूलच्या संस्थापक आहेत. त्यांचे पती इम्रान शेख हे फिल्म प्रोड्यूसर असून त्यांना समीरा ही ८ वर्षांची गोंडस मुलगी आहे. मोनिका या मिसेस महाराष्ट्र २०१६ च्या ऑडिशनसाठी गेले असता ‘दिवा पेजंट स्टुडिओ’च्या कार्ल आणि अंजना मस्करेन्हस यांनी सर्वप्रथम त्यांच्यातील गुणवत्ता हेरली. कार्ल व अंजना यांच्या मार्गदर्शनाखाली मोनिका यांनी आपली पुढील वाटचाल सुरू केली. मोनिका यांनी त्यानंतर झालेल्या ‘मिसेस स्टाईल आयकॉन’ व ‘ब्यूटी विथ पर्पझ’ या स्पर्धा जिंकल्या. अंजना याच आपल्यासाठी मेंटर, फिलॉसॉफर व मार्गदर्शक असून मोनिका त्यांनाच आपल्या भरीव यशाचे श्रेय देतात.